Breakingधक्कादायक : नारायणगाव येथे कचऱ्यात आढळला शस्रक्रिया केलेल्या रुग्णाचा पाय, "डॉक्टर आणि आया" यांचेवर गुन्हा दाखल


नारायणगाव दि.२३ (रविंद्र कोल्हे) : नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत एका रुग्णाचा (मानवी) पाय आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर हा चर्चेचा विषय झाल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. पोलिस हवालदार पोपट मोहरे यांनी फिर्याद दिली.


नारायणगाव येथील हॉस्पिटलमध्ये एका जेष्ठ नागरिकावर शस्रक्रिया करून त्याचा पाय काढण्यात आला होता. मात्र त्याची विधिवत किंवा सुरक्षित विल्हेवाट न लावल्याने संबंधित डॉक्टर व हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या मावशी (आया) या दोघांवर नारायणगाव पोलिसांनी निष्काळजीपणा व  साथरोग पसरवणे या कारणास्तव गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांनी पत्रकारांना दिली.


याबाबत अधिक माहिती अशी की, वारुळवाडी गावच्या हद्दीत नारायणगाव आणि वारुळवाडी गावचा कचरा डेपो आहे. या ठिकाणी कचरा गाडीतून कचरा खाली केल्यानंतर गाडीतून मानवी पाय कचऱ्यात आढळला, गाडी चालकाने संबंधित ग्रामपंचायतीला या प्रकरणाची माहिती दिली. त्यामुळे चौकशीचे चक्र तात्काळ फिरवले गेले. यावरून असे निदर्शनास आले की, बसस्थानकाजवळील मते हॉस्पिटलमध्ये एका ८१ वर्षीय रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना रुग्णाचा गँगरीन झालेला निकामी झालेला डावा पाय डॉ.मते यांनी शस्रक्रियेद्वारे गुढघ्याच्या खाली काढून टाकला होता. त्याचे योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असतांना संबंधित डॉक्टर अजय धोंडिभाऊ मते यांनी लक्ष न देता व निष्काळजीपणे रुग्णालयातील मावशी (आया) सुनिता जाधव यांनी सदरचा मानवी पाय हा कचऱ्यात टाकला. त्याचे पासून संसर्ग रोग पसरू शकतो. या प्रकरणावरून नारायणगाव पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम २६९, २७० अन्वये दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा