Breaking

आशांच्या पदरी वेठबिगारीच, राज्य सरकारच्या फक्त घोषणा ! आशा व गटप्रवर्तकांमध्ये तीव्र संताप


सातारा : राज्य व केंद्र सरकार आशांना विना मानधन वेठबिगारीसारखे राबवून घेत आहे. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांंमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप आहे. सरकारने मानधनाचा प्रश्न त्वरित सोडवावा, अन्यथा १० सप्टेंबर पासून सर्वच कामावर बहिष्कार करावे लागेल, असे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा आनंदी अवघडे म्हणाल्या. 


पुढे बोलताना अवघडे म्हणाल्या, केंद्र सरकार कोव्हीड कामासाठी आशांना महिना १००० रुपये भत्ता देता होते, परंतु जुलै २०२१ पासून 'कोव्हीड भत्ता' बंद करण्यात आला आहे. तसेच २०१९ च्या संपात राज्य सरकारने आशा स्वयंसेवकांना २००० रुपये व गटप्रवर्तकांंना ३००० रुपये मानधन वाढ केली होती. परंतु ती वाढ देखील एप्रिल पासून देण्यात आलेली नाही.


तसेच १५ जून २०२१ रोजी ९ दिवसाचा संप केल्यानंतर आशांना १५०० रुपये तर  गटप्रवर्तकांना १७०० रुपये वाढ देण्यात येणार होतील. शासन निर्णय होऊनही अद्यापही आशा व गटप्रवर्तकांना मानधन वाढ मिळालेली नाही, असेही अवघडे म्हणाले.

२४ सप्टेंबरला आशा व गटप्रवर्तकांचा देशव्यापी संप

देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात देशभरातील योजना कर्मचाऱ्यांनी २४ सप्टेंबर २०२१ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच २७ सप्टेंबर २०२१ रोजी देशातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक संघटनांनी भारत बंद ची हाक दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार असल्याचे आनंदी अवघडे म्हणाल्या.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा