Breaking


15% फी सवलत न देणाऱ्या शाळांवर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी



रत्नागिरी : 15% फी सवलत न देणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दापोलीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सुद्धा पाठविण्यात आली आहेत.


निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने वार्षिक शैक्षणिक शुल्कात 15% सवलत देण्याचा आदेश दिला आहे. मात्र काही शिक्षण संस्था सवलत न देता पालकांकडून संपूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे फीमध्ये सवलत न देणाऱ्या शाळा पालक व विद्यार्थी यांना वेठीस धरत आहेत. शैक्षणिक फी संदर्भात बिरसा फायटर्स संघटनेस पालकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.


कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाचे आर्थिक, व्यावहारिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक पालकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शाळा बंद असूनही शाळांकडून आकारण्यात येणारी फी काही पालकांना भरणे अशक्य आहे. तसेच शाळेतील प्रयोगशाळा, लॅब, खेळाचे साहित्य, लाईट, इतर उपकरणे, ग्रंथालय इत्यादी गोष्टींचा विद्यार्थ्यांनी अजिबात वापर केलेला नाही, म्हणून त्याची पालकांनी फी का भरायची?असाही प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. या सगळ्या बाबींचा विचार करून शासनाने शैक्षणिक फीमध्ये 15% सवलत देण्याचा आदेश दिला आहे. मात्र काही शाळेत या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासनाचा आदेश असुनही काही शाळांकडून 100% फी पालकांकडून वसूल केली जात आहे. फी न भरणाऱ्या पालक व विद्यार्थी यांना वेठीस धरत आहेत. अशा शैक्षणिक शुल्कात 15% सवलत न देणाऱ्या शाळांची चौकशी करून  शाळांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली यांच्याकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा