Breaking

युपी : पायाभूत सुविधा विकासाच्या जाहिरातीत बंगालचे हायवे आणि अमेरिकेचे कारखाने


लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाच्या जाहिराती राज्यभर प्रकाशित केल्या आहेत. मात्र या जाहिरातीमध्ये पश्चिम बंगाल सरकारने विकसित केलेला कलकत्ता येथील नवा हायवे दाखवण्यात आला आहे, तसेच जाहिरातीत दाखवलेले कारखाने अमेरिकेतील आहेत.


तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ट्वीट करून यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्रान्सफॉर्मिंग यूपी म्हणजे पश्चिम बंगालमधील पायाभूत सुविधांचे फोटो चोरणं, असं आहे का? असा सवाल करत अभिषेक बॅनर्जी यांनी निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात बांधण्यात आलेला पूल हा आपल्या राज्यातील असल्याचा दावा योगी सरकार करतंय, असा टोला बॅनर्जींनी लगावला आहे.


रस्ते बंगालचे, फॅक्टरी अमेरिकेची परंतु विकास उत्तर प्रदेशचा. कोलकात्याचा रस्ता चोरला ठिक. कोलकात्यातील इमारतही चोरली ठिक. परंतु योगी या जाहिरातीतून पिवळी टॅक्सी काढून टाकायलाही विसरले, अशा शब्दांत पत्रकार रोहिणी सिंग यांनी योगींवर टिकास्त्र सोडले आहे.


‘ट्रान्सफॉर्मिंग उत्तर प्रदेश’ म्हणजे वृत्तपत्रात देशभर जाहिरातबाजीवर लाखो रुपये खर्च करायचे आणि कोलकात्यातील विकासाची छायाचित्रे चोरायची?, असा सवाल पत्रकार साकेत गोखले यांनी केला आहे. म्हणजे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचा बंगाल करणार का? का नाही? चांगली आयडिया आहे, असे पत्रकार वीर संघवी असे म्हटले आहे.


दरम्यान, जाहिरातीवरून राजकीय वादाला तोंड फुटल्याने यूपीमधील भाजप सरकारची गोची झाली आहे. उत्तर प्रदेशच्या माहिती प्रसारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी या प्रकाराबाबद्दल दिलिगिरी व्यक्त केली आहे. तसंच पब्लिशरमुळे ही चूक झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी संबंधित वृत्तपत्राचं ट्वीट हे रिट्वीट करून म्हटलं आहे. तसंच वृत्तपत्रानेही आपल्या ट्वीटमध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे. आक्षेप घेण्यात आलेले फोटो हे जाहिरातीतून हटवण्यात आले आहे, असं वृत्तपत्राने म्हटलं आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'या वृत्तपत्राने यूपी सरकारची ही जाहिरात छापली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा