Breaking

.. तर मोदी सरकारही पडू शकते ! - अण्णा हजारे


केंद्रातील सत्ताधारी पक्षापासून देशाला उज्वल भवितव्य नाही


राळेगणसिद्धी / रवींद्र कोल्हे : "पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा" याचाच वापर करून सर्व राजकीय पक्ष फक्त संपत्ती आणि संपत्ती याच्या मागे पळत आहेत. तथापी केंद्रातील सत्ताधारी पक्षापासून देशाला उज्वल भवितव्य नाही. या राजकीय पक्षाने स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेऊन काम चालू ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखायला एकच उपाय आहे तो म्हणजे "जनशक्तीचा दबाव." देशातील जनता जागी होऊन "केंद्र सरकार विरुद्ध दबाव निर्माण केल्यास मोदी सरकारही पडू शकते असा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला असल्याची माहिती पारनेर न्यूज"ने दिली.


राळेगणसिद्धी येथे आज सोमवार दि.१३ रोजी झालेल्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय शिबिरात मार्गदर्शन करतांना हजारे बोलत होते. यावेळी देशातून १४ राज्यातून ८५ कार्यकर्त्यांनी या शिबिरात भाग घेतला होता. या कार्यक्रमाला दिल्लीतून जगदीश प्रसाद सोळंकी, हरियानातून अशोक मालिक व विकल पचार, राज्यस्थानातून योगेंद्र पारीख, रामपाल जाट आणि दशरथ भाई, उत्तराखंड मधून भोपालसिंह चौधरी, उत्तर प्रदेशातून प्रवीण भारतीय, आसाम मधून विष्णू प्रसाद बराल, कर्नाटकातून दयानंद पाटील आणि महाराष्ट्रातून अशोक सब्बन, मुंबईतून एकमेव कल्पना इनामदार आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीतील "समाजसेवेचा ऑक्सिजन" घेतला.


केजरीवालांच्या डोक्यात एका रात्रीत मुख्यमंत्रीपदाचे भूत घुसल्याने सन २०११ ला दबावतंत्रात फाटाफूट झाली असा गौप्यस्फोट अण्णा हजारे यांनी यावेळी केला. 

कोणत्याही पार्टी कडून देशाला भवितव्य नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, देशातील पहिल्या महिला आयपीएस (IPS) अधिकारी किरण बेदी यांना मी म्हणालो होतो की, जनशक्तीचा दबाव निर्माण करण्यातच लोकशाहीचा विजय आहे. असे सांगत असतांनाच एका रात्रीत केजरीवाल यांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचे भूत घुसले. देश वाचवायचा असेल तर लोक संघटनेत संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मकता हवी. चांगले गुणात्मक लोक संघटनेत हवेत असेही अण्णा हजारे शेवटी म्हणाले.


1 टिप्पणी: