Breakingआंबेगाव : रावण दहन प्रथा बंद करावी - बिरसा क्रांती दलाची मागणी


आंबेगाव / केशव पवार 
रावण दहन प्रथा बंद करावी, अशी मागणी बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका समितीच्या वतीने तहसीलदार व पोलीस ठाणे अंमलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, न्यायप्रिय महात्मा राजा रावण अत्यंत समृद्ध सांस्कृतीच्या वैभवशाली वारसाचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. हजारो वर्षांपासून मूलनिवासी आदिवासी त्यांची पूजा करतात, त्याला आपला महानायक शूरवीर योद्धा महाज्ञानी बलाढ्य शक्तीसाली विद्वान अनेक शास्त्रांचा अभ्यासक व शंभुचा पुजारी मानतात. आजही रावण पूजा मेघनाथ पूजा करतात. तामिळनाडूमध्ये राजा रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. 

छत्तीसगड मध्यप्रदेश झारखंड आणि महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसह सर्वत्र राजा रावणाची पूजा केली जाते. अशा या महान राजाला इथल्या षड्यंत्रकारी व्यवस्थेने बदनाम करण्याचा कोणताच कसूर ठेवला नाही. खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे. पंरतु सत्य लपून राहत नाही ते कधी ना कधी तरी उघड होतेच. आदिवासी समाजातील व इतरही समाजातील संशोधक साहित्यिक यांनी राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर मांडला आहे. 

रावण हे आदिम संस्कृतीचे श्रध्दास्थान व दैवत आहे. १९३० पासून त्याला जाळतात. त्यांच्या बद्दलचा राग द्वेष मत्सर व त्याला अपमानित उपरोधिक नावाने राक्षस संबोधून जाळतात. त्यामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात व येणाऱ्या पिढीमध्ये ही द्वेष मत्सराची व पेटवून देण्याची भावना कायम रूजून राहते. समाजामध्ये शांती सुरक्षा भाईचारा समता न्याय बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकांच्या धार्मिक भावना व देवा- देवतांच्या आदर्श महामानवांना वंदन करण्याच्या सन्मान करण्याचा संविधानिक अधिकार व स्वातंत्र्य आहे. तेव्हा रावण दहन प्रथा बंद करावी व समस्त मूलनिवासी आदिवासी समाजाच्या भावनेचा विचार व्हावा. या प्रथेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहन या विक्षिप्त कृतीला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये. यादरम्यान अशा विक्षिप्त कृतीचे जे कुणी समर्थन करतील अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.

जर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला गेला तर सर्व आदिवासी समाजाकडून तसेच इतरही समाज संघटनांकडून तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल, अशा अशायाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बिरसा क्रांती दलाचे तालुका संघटक अजित गवारी, बाळू गवारी, महासचिव विनायक धादवड आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा