Breaking
बीड : खरीप २०२० चा पीक विमा मिळेपर्यंत माघार नाही - कॉ अजय बुरांडे


बीड, ता.३१ : खरीप २०२० चा पीक विमा शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत किसान सभेच आंदोलन सुरूच राहणार आहे. पीक विमा कंपनी व शासनाने शेतकऱ्यांचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी केले आहे.


शिवणी येथील शेतकऱ्यांनी पीक विमा संघर्ष दिंडी गावात येताच जोरदार स्वागत केले. यावेळी झालेल्या सभेत कॉ. अजय बुरांडे बोलत होते. पुढे बोलताना कॉ. बुरांडे म्हणाले की, पीक विमा संघर्ष दिंडी शेतकऱ्यांमध्ये पिक विम्याबाबत जागरूकता निर्माण करून सरकारला जागे करण्यासाठी आहे. किसान सभेच्या पीक विमा संघर्ष दिंडीचा रविवार (ता.३१) तिसरा दिवस आहे. आम्ही ७५ किमी चा पायी प्रवास केला आहे. संघर्ष दिंडीच्या तिसऱ्या दिवशी पीक विमा कंपनीने २०२१ खरीप पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात केली आहे. २०२१ चा विमा देतानाच २०२० खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. सोमवारी (ता.१) पीक विमा संघर्ष दिंडी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. जोपर्यंत २०२० पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन चालुच राहणार आहे. २०२० च्या पीक विमा यावर्षीच्या अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, जिल्ह्यातील सर्व उस गाळप करण्याची सोय करावी या मागणीसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बसुन राहतील. शेतकऱ्यांची दिवाळी जिल्हाधिकारी यांच्या दारी साजरी होणार आहे. या आंदोलनात सोमवारी (ता.१) शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. - तीन दिवसापासुन ७५ किमी चे अंतर चालल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पायाला फोड आले आहेत. काही शेतकऱ्यांचे चप्पल-बुट फाटल्यामुळे अनवाणीच चालत असल्यामुळे पायाला जखमा झाल्या आहेत.


- तीन दिवसापासुन पीक विमा संघर्ष दिंडीतील शेतकऱ्यांच्या जेवणाची, चहा व पाण्याची सोय रस्त्यावरील गावातील शेतकरी करीत आहेत. काही ठिकाणी गावकरी घरोघरी मागुन जेवन गोळा करून दिंडीतील शेतकऱ्यांना जेवन देताना दिसत आहेत.


- खरीप २०२० व २०२१ चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने सिरसाळा ते बीड पीक विमा संघर्ष दिंडी काढलेली आहे. शुक्रवारी (ता.२९) परळी तालुक्यातील सिरसाळा येथुन निघाली आहे. रविवारी (ता.३१) बीड तालुक्यात संघर्ष दिंडी पोंहोचली आहे.


यावेळी किसान सभेचे कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन जाधव यांचीही भाषणे झाली. पीक विमा संघर्ष दिंडीत परळी, माजलगाव, धारूर, वडवणी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा