Breaking


ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार



मुंबई, दि.१५ : राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 


वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यात सुमारे ४५ हजार हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार आहे. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या ३ संधी कमी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल.


पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांची गरज भागेल तसेच पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या तपासी अंमलदारांच्या सध्याच्या संख्येमध्येही भरीव वाढ होणार आहे.


पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या पातळीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने यासंदर्भातील प्रस्तावावर गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी व शासन निर्णयही निर्गमित करण्यात यावा अशा सूचना देऊन हा प्रस्ताव आज मंजूर केला.


सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर ३ वर्ष सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात, किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. त्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.


संख्यात्मक वाढीत सांगायचे तर पोलीस दलामध्ये सध्याच्या ३७,८६१ पोलीस हवालदारांची संख्या ५१,२१० होणार असून १५,२७० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची संख्या १७,०७१ होणार आहे. एकंदर १५,१५० अतिरिक्त तपासी अंमलदार उपलब्ध होवून, प्रत्येक पोलीस स्थानकाकरिता १३ अतिरिक्त अंमलदार मिळणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा