Breakingशेतकऱ्यांना ओला दुष्काळ व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी बिरसा फायटर्सची मागणी


रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ओला दुष्काळ, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील शेती ही पूर्णत: मॉनसूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यातच आदिवासी बहुल अनेक तालुक्यातील आदिवासी शेतकरी हा जास्त प्रमाणात वनपट्टेधारक आहे. जो मागील ४ ते ५ वर्षांपासून नैसर्गिक संकटांनी कोलमोडून गेलाय. त्यातच या वनपट्टेधारक शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळत नाही. परिणामी कर्ज काढून शेती करणारा हा शेतकरी दिवसेंदिवस अधिकच कर्जबाजारी झालेला आहे.


राज्यातील वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही यावर्षीचा ओला दुष्काळ, अतिवृष्टीने झोडपून काढलेले आहे. शेतातील कापूस, मूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भूईमूग आदी पीके हातची गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी सावकारी कर्ज आणि नैसर्गिक संकटामुळे दुहेरी संकटात सापडलाय. तसेच वाढलेली महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.


या मागणीचे निवेदन राज्याध्यक्ष मनोज पावरा, राज्य उपाध्यक्ष राजेश धुर्वे, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, महासचिव राजेंद्र पाडवी, महानिरीक्षक केशव पवार, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा