Breaking


शासनाच्या शेतकरी योजनांपासून महाराष्ट्रातील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित - आमदार डाॅ. राहुल आहेरचांदवड (सुनिल सोनवणे) : सलग दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती व कोरोना काळ यांच्या संकटात महाराष्ट्रात होरपळून निघत आहे. त्यामुळेच शेतकरी वर्ग सुद्धा यात भरडला जात आहे. ऐन दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करून हे महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात आमदार डॉ.राहुल आहेर यांनी चांदवडच्या पत्रकार परिषदेत केला.


चांदवड तालुक्यात बऱ्याच ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने मका, सोयाबीन, कांदा व कडधान्य इत्यादी प्रकारचे पिकांचे अतोनात नुकसान झाले परंतु शासनाच्या नाकर्तेपणामुळे स्कायमेट व महसूल यंत्रणेत पावसाच्या आकडेवारीतील प्रचंड तफावत असल्याने व जी पर्जन्यमापक यंत्रे महसूल विभागात दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिसरात बसवली आहेत. त्यामुळे सदरील परिघात एक किलोमीटर अंतरावर जरी ढगफुटी सारखा पाऊस पडला तरी ज्या गावात ही यंत्रणा बसवली आहे, त्या गावात पावसाचे प्रमाण अत्यल्प असेल तर या यंत्रणेमुळे महसूल विभागाची आकडेवारी व या यंत्रणेची आकडेवारी यात खूपच फरक पडतो. व ज्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाली आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना याचा कोणत्याही प्रकारचा फायदा न होता तोटाच जास्त होतो. प्रत्येक गावात पर्जन्यमानाचे नियंत्रक बसून मिळावे अशी मागणी आपण कृषी मंत्र्यांकडे केली असल्याची आमदारांनी सांगितले.


यावेळी आमदारांनी युती शासनाच्या काळात व आत्ताच्या काळात पिक विमा संदर्भात तफावतीची सविस्तर माहिती दिली. शासनाने यावर्षी पीक विम्याचा हप्ता सुद्धा आज पर्यंत अर्धा भरलेला आहे. पिकविमाचे निकष बदलल्याने शेतकरी बांधव या पीकविमा पासून वंचित राहत आहेत त्यामुळे दोन वर्षापासून जी शेतकर्‍यांची हेळसांड सुरू आहे, ती बंद करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी आशा आमदारांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.


गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना युती सरकारने त्यांच्या काळात सुरू केली, डिसेंबर 2020 एप्रिल 2021 या चार महिन्यांचा हप्ताच महाराष्ट्रातील आघाडी सरकारने भरलाच नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार शेतकरी कुटुंब या गोपीनाथ मुंडे अपघात योजनेपासून वंचित राहिले.


या पत्रकार परिषदे वेळी डॉ.आत्माराम कुंभार्डे, डॉ.नितीन गांगुर्डे, भूषण कासलीवाल, अशोक भोसले, सुनील शेलार, अशोक व्यवहारे, मोहन शर्मा, मनोज शिंदे, गणेश महाले, युवराज आहेर, प्रशांत ठाकरे, आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा