Breaking



पिंपरी चिंचवड : कामगार नेते कैलास कदम यांची शहर काँग्रेस अध्यक्षपदी निवड

File Photo

पिंपरी चिंचवड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) च्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी कामगार नेते कैलास कदम यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के.सी.वेणूगोपाल यांनी निवडीची घोषणा केली आहे.


तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी ११ नोव्हेंबर २०२० रोजी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतरही ११ महिने त्यांच्याकडेच जबाबदारी दिली होती. साठे यांची राज्य कार्यकारिणीत सचिवपदी वर्णी लागली. त्यानंतर काँग्रेसने शहराध्यक्षपदी कदम यांची निवड केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांची निवड महत्वाची मानली जात आहे.


पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील कामगार चळवळीत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे ते अध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर औद्योगिक आणि कामगार नगरी म्हणून नावलौकिक आहे. शहराच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा संपर्क आहे.


कोण आहेत कैलास कदम


कैलास कदम यांचा जन्म एका सामान्य कामगाराच्या कुटुंबात झाला. पिंपरी येथील एच.ए. स्कूल इंग्रजी माध्यमतून शिक्षण झाले. कदम यांच्या नेतृत्वात १९९७ च्या निवडणुकीत पहिली महिला नगरसेविका बिनविरोध निवडून आणली गेली‌. २००७ च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत कदम यांच्या वहिनी निर्मला कदम खराळवाडीतून निवडून आल्या. पुढे २०१२ च्या निवडणुकीत स्वतः कैलास कदम व त्यांचे बंधू सद्गुरू कदम निवडून आले. 


कैलास कदम यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते या व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्या पदावर काम केले, ते इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. पगारवाढ करार, अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देणे, कामगारांना नोकरीत कायम करणे, परदेशात विविध देशांमध्ये कामगार परिषदांना भारताच्या वतीने प्रतिनिधीत्व केले आहे. त्याच बरोबरीने त्यांनी कोकणातील असंख्य बांधवांना एकत्र करून पिपरी चिचंवड शहरामध्ये कोकण विकास महासंघाची स्थापना केली. 


एका कामगार नेत्याला काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देत काँग्रेस नेतृत्वाने या औद्योगिक नगरीत कामगार व काँग्रेसचे संयुक्त समीकरण करून कौशल्यपुर्ण निर्णय घेतला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पिंपरी चिचंवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निवडीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडी बाबत कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा