Breakingमाहूर : कठोर मेहनत आणि जिद्द यशस्वीतेचा पाया - कॉ. विनोद गोविंदवार यांचे प्रतिपादन


माहूर, ता.१० : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया माहूर तालुका कमिटीच्या वतीने आकाश कांबळे आणि आशिष वाघमारे यांच्या शिकवणी वर्गावर शहीद भगत सिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त कॉ. विनोद गोविंदवार, मुखेड यांचं भगतसिंग आणि SFI या विषयावर व्याख्यान झाले.


कार्यक्रमाची सुरुवात भगत सिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरू झाली. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SFI चे नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर यांनी केले. विचारमंचावर SFI चे राज्य कमिटी सदस्य स्टॅलिन आडे, कांबळे आणि कॉ. विनोद गोविंदवार उपस्थित होते.


कॉ. विनोद गोविंदवार यांनी भगतसिंग यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत त्यांचे क्रांती कार्य आणि त्यांचे विचार संक्षिप्त रूपात विद्यार्थ्यांसमोर मांडत असताना जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता जिद्द मेहनत व त्याग महत्वाचे आहे. तेव्हाच यशाची शिखरे गाठता येतात. आज आपण जे शिक्षण घेतो यासाठी अनेक समाजसेवक व क्रांतिकारकांनी उभे आयुष्य घातले आहे, तेव्हा तुम्हा आम्हा बहुजनांना शिक्षणाची दार उघडले आहे. ती पण सध्याचे भांडवली सरकार खाजगीकरण करून महागडी करीत आहे, तेव्हा शिक्षण घेत असताना भगतसिगाचे विचार डोळ्यासमोर "पढाई और लढाई" दोन्ही सोबतच करावी लागेल. अन्याय व हक्कासाठी लढाई तर जीवनात यशस्वी होण्यासाठी लढाई गरजेची आहे, असे गोविंदवार म्हणाले.


यावेळी तुषार कांबळे, सिद्धार्थ मुळे तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे तसेच क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकाश कांबळे केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा