Breaking


नाशिक : आदिवासी बचाव अभियानाची वार्षिक बैठक संपन्न, विविध विषयांवर चर्चा


कळवण / सुशिल कुवर : आज महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाची वार्षिक आढावा बैठक ज्येष्ठ सल्लागार एकनाथ भोये यांच्या अध्यक्षतेखाली चणकापूर येथे उत्साहात संपन्न झाली. 


यावेळी जननायक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे जे बांधव निसर्गवासी झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 

धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील तालुका निहाय आलेल्या सक्रिय पदाधिकारी यांनी वर्षभरातील सामाजिक कार्याचा आढावा सादर करून येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पवार म्हणाले की, "९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस चणकापूर येथील हुतात्मा स्मारक येथे घेण्यात यावा. दरवर्षी शासकीय पातळीवर जागतिक आदिवासी दिवस साजरा होतो परंतू प्रत्यक्ष ज्यांनी जल, जंगल, जमीन रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली त्या आदिवासी क्रांतिविरांचा इतिहास सांगितला जात नाही. चणकापूर येथे १९३० ला इंग्रज आणि आदिवासी यांच्यात झालेल्या लढाईचे वर्णन करून लवकरच त्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित होत असल्याचे जाहीर केले. यापुढे सामाजिक, राजकीय तसेच कायदेविषयक ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना प्रतिनिधित्व देऊन त्यांना निवडून द्यावे जेणेकरून आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यास अडचणी येणार नाहीत. नाशिक जिल्हाध्यक्ष रावण ऊर्फ राम चौरे यांनी नाशिक जिल्ह्यातील सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांना येत असलेल्या  अडचणीवर प्रकाशझोत टाकला. शासनाच्या योजना, आदिवासींवर होणारे अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, तसेच पोथ्या, दंत कथा न वाचता संविधान वाचा असे आवाहन करून आदिवासी संस्कृती, संस्कृती संवर्धन, भाषा संवर्धन यावर मार्गदर्शन केले. ठाणे येथून आलेले रोहिदास डगळे हे राज्य जैव विविधता संरक्षण सदस्य यांनी जैव विविधता व आदिवासी समाज यांचे निसर्गाशी असलेले नाते यावर मार्गदर्शन करून आपल्या गावातील जैव विविधता रजिस्टरमध्ये विविध दुर्मिळ वनस्पती, जीव-जंतू यांच्या नोंदी ठेवाव्यात असे आवाहन केले. 

केंद्रीय सरचिटणीस किसन ठाकरे म्हणाले की, "यावर्षी देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करीत आहे त्यानिमित्ताने अनामविरांचा इतिहास जनतेसमोर आणत असतांना आदिवासी क्रांतिकारकांकडे मात्र अजूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी आदिवासी अनामवीरांचा इतिहास आदिवासी जनतेसमोर आणण्याचे काम आदिवासी बचाव अभियान आगामी वर्षात करेल, त्यासाठी १५ नोव्हेंबर धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त "राष्ट्रीय आदिवासी युवा दिन" म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी मनोगतातून व्यक्त केले. 

याप्रसंगी आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल यांनी आदिवासी बचाव अभियानाच्या कामकाजाची पद्धत, संघटन, परिवर्तनशिल उपक्रम, आदिवासी बचाव अभियानाचा इतिहास, आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी, धार्मिक आक्रमण, सांस्कृतिक आक्रमण, संस्कृती, गायन, वादन, नृत्य कलाकार, कोरोना काळात कोविड लसीकरण बद्दल जनजागृती साठी छोटया छोट्या व्हिडीओ क्लिप तयार करून प्रबोधन करणारे कलाकार, छोटे मोठे व्यावसायिक यांचा सन्मान, देशातील विविध आदिवासींच्या सामाजिक व  राजकीय पक्षांचे प्रतिनिधी १३ सप्टेंबर जागतिक आदिवासी अधिकार दिनाच्या निमित्ताने २०१६ दिल्ली येथील कार्यक्रमापासून एका छताखाली येत आहेत ही जमेची बाजू असल्याचेही स्पष्ट केले. 

कोविड - १९ काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणारे बांधव, गुणवंत विद्यार्थी, यांचा सन्मान आपण करणार असल्याचे जाहीर केले. आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय उपाध्यक्ष कृष्णा दादा गावीत यांनी नंदुरबार जिल्ह्याचा आढावा सादर करून आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास शबरी महामंडळ व जात पडताळणी कमेटी यांच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना एकनाथ भोये म्हणाले की, आदिवासी लोकप्रतिनिधी मग ते ग्रामपंचायत ते लोकसभा सदस्य असू देत त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित करून लाभार्थीस लाभ मिळवून द्यावा. शिवाय घटनादत्त अधिकार, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक आरक्षण तसेच हिंदू कोड बील व आदिवासी यावर मार्गदर्शन केले. 

यावेळी आदिवासी महिला केंद्रीय संघटक सरोजताई भोये, केंद्रीय संस्कृती संवर्धक प्रमुख कवी रमेश भोये, तानाजी बहिरम, रतन चौधरी, वसंत राऊत, अमोल गावीत, प्रकाश मोंढे, संतोष इंपाळ, भरत चव्हाण, दीपक देशमुख, सरपंच टोपले, बहिरम सर साक्री, पंकज सूर्यवंशी, सुरेश गावीत, राजधर अहिरे, जयराम गावीत, नंदिनीताई बागुल, चिंतामण दादा गायकवाड, दिनकर ठाकरे, सुशिल कुवर, आदींनी मनोगत व्यक्त केले. 

याप्रसंगी अडव्होकेट दत्तू पाडवी, जयवंत गारे,गितेश्वर खोटरे, पुणे जिल्हा प्रमुख पंडित बहिरम, आनंदा भोये, एस. टी. बागुल, शिवमन साबळे, विजय तुकाराम पवार, प्रा. प्रदिप इंपाळ, देशमुख भाऊसाहेब, भोये भाऊसाहेब, तुषार बर्डे, राहुल गावीत,पारधी काका, सुनिल जोपळे, संदीप जगताप, योगिताबाली पवार, सुजताताई बागुल व शेकडो सक्रिय पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय कार्याध्यक्ष के. के. गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे यांनी तर आभार पंकज बागुल यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा