Breakingचार महिन्यापासून मानधन नाही ; आशा स्वयंसेविकांचे काम बंद आंदोलनकराड (दि.१३) : केंद्र सरकार व राज्य सरकार कडून गेल्या चार महिन्यापासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे कराड तालुक्यातील सुमारे पाचशे आशा स्वयंसेविकांनी आजपासून काम बंद आंदोलन पूकारले असून येथिल प्रशासकीय इमारती समोर आंदोलन सूरू केले आहे. जोपर्यंत संपूर्ण मोबदला दिला जात नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचा इशारा आशा व गटप्रवर्तक युनियनने दिला आहे.कराड शहरासह तालुक्यात ४७५ आशा स्वयंसेविका व २५ गटप्रवर्तक सध्या काम करीत आहेत. नियमित कामाबरोबरच करोना काळातील सर्व कामे या महिलांनी आजपर्यंत केली आहेत. परंतु गेल्या चार महिन्यापासून केंद्र सरकार व राज्य सरकारकडून मिळणारा मोबदला (मानधन) अद्यापही कराड तालुक्यातील आशा सेविकांना दिला गेला नसल्याने तालुक्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. थकित मानधन त्वरित देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. 


आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीच्या वतीने दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा, थकित मानधन त्वरित मिळावे, लसीकरण व करोना टेस्टिंगचे काम आशा सेविकांना देण्यात येऊ नये कारण त्याचा कोणताही मोबदला मिळत नाही, शिवाय कोविड लसीकरण डाटा एन्ट्री चे काम ही गटप्रवर्तक करणार नाहीत, मात्र या कामाचा मोबदला दिला तर हे काम गटप्रवर्तक करतील असेही या निवेदनात म्हटले आहे.


यावेळी यूनियनच्या अध्यक्ष आनंदी अवघडे तसेच अर्चना पवार तेजश्री घाडगे, लतिका शिवथरे, पुनम रवीढोणे, भाग्यश्री पाटील, सारिका शिरतोडे, वैशाली शेजवळ, सुवर्णा पाटील, शीला साळुंखे, सविता पवार, भाग्यश्री कोळेकर, उषा थोरात, दीपा जाधव, निर्मला माने, रूपाली बांईग यांच्यासह आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा