Breaking


पुणे : अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, शिधापत्रिका आणि आधार कार्ड देण्याची मागणी


मावळ : वडगाव मावळ तालुक्यातील सुदुंब्रे गावा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती - जमातींच्या कुटुंबांना जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, शिधापत्रिका आणि आधार कार्ड मिळावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया, जाती-अंत संघर्ष समिती व अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीने मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, या वस्तीवरील दोनशे कुटुंबांना व त्यांच्या अपत्यांना जात प्रमाणपत्र नसल्यामुळे शिक्षण घेणे अवघड झाले असून त्यांना कोणत्याही शैक्षणिक सवलती मिळत नाही व महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. यापूर्वी या लाभार्थ्यांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना वारंवार कळूनसुद्धा प्रशासनाकडून त्यांना जात प्रमाणपत्र मिळाले नाही.

किसान सभेचे कॉम्रेड नाथा शिंगाडे, बाळासाहेब शिंदे, जातीअंत संघर्ष समितीचे डॉ. किशोर खिल्लारे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड गणेश दराडे, जनवादी महिला संघटनेच्या अपर्णा दराडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

यावेळी तहसीलदार बर्गे यांशी दिवाळीनंतर सर्व अर्जदारांना कॅम्प लावून जात प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. पंधरा दिवसात जात प्रमाणपत्र न दिल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी मीरा भांगे, अमित पारधी, महेश पारधी, कोमल गावडे, आकाश गावडे, अंजना खांडवे, अंजना जाधव, जनाबाई जाधव, पुनम बेंडाळे, सगुना गावडे हे लाभार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा