Breakingउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सबंधित कंपन्यांवर छापे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक


अकोले : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्या तसेच त्यांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले असून केंद्र सरकारच्या या कृत्याचा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अकोले तालुकाध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.


"राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या काही खाजगी कंपन्यांवर आयकर विभागाने छापे टाकले आहे. तसेच अजित पवार यांच्या कोल्हापूर व पुणे येथील बहिणींच्या घरावर ही आयकर विभागाने छापे टाकले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत असंतोष पसरला आहे. केंद्र सरकारने राजकीय द्वेषापोटी अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांवर ही कारवाई केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार मुद्दामहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सूड उगारत आहे,कारवाई थांबवावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल," असा इशारा अकोले तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघाने वतीने देण्यात आला आहे.

एक समाजाभिमुख, लोकहितकारी, लोकप्रिय नेतृत्वाचे खच्चीकरण करण्यासाठी हा रचलेला एक कुटील डाव आहे. पण या लोकांच्या डावाला आमचं नेतृत्व घाबरणारं नाही. त्यामुळे केंद्र सरकारने राजकीय सूड घेण्याचे हे धंदे बंद करावेत. अन्यथा रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा