Breaking
एसएफआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी


बीड (ता.२७) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच नीट ही परीक्षा रद्द करण्याची मागणी यावेळी एसएफआयने या आंदोलनात केली. एसएफआय केंद्रीय कार्यकारी कमिटीच्या वतीने आज दि. २७ ऑक्टोबर रोजी नीट परीक्षेच्या विरोधात आणि इतर शैक्षणिक मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.


दिलेल्या निवेदनात एसएफआयने म्हटले आहे की, नीट ही केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा उरलेली नाही. शिक्षण व्यवस्थेला विद्यापीठीय आणि वर्ग खोल्यांतील शिक्षणापासून दूर करण्यासाठीचा हा एक सोयीचा मार्ग आहे. हे हिमनगाचे टोक आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२०च्या अजेंडाचाच एक आरंभिक बिंदू आहे. ज्याद्वारे सर्व पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी एनटीएकडून नॅशनल ऍप्टीट्युड टेस्ट घेतली जाणार आहे. साधारणपणे संबंधित विद्यापीठ हे आपली प्रवेश प्रक्रिया ठरवते. नीट परिक्षेमधून केंद्र सरकार संसदेच्या कायद्याद्वारे प्रवेश प्रक्रिया ठरवत आहे. राज्य घटनेतील प्रवेशाबाबत दिलेल्या तरतुदी अंतर्गत, राज्यांना विद्यापीठे स्थापन करण्याचा आणि त्यांचे नियमन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. नीट हे राज्यांच्या विद्यापीठांमधील प्रवेश प्रक्रियेचे नियमन करण्याचा अधिकार काढून घेते. घटना दुरुस्ती न करताही हे घडत आहे. असे एसएफआयने म्हटले आहे.


एसएफआयने केल्या 'या' मागण्या

(१) विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करणारी नीट परीक्षा रद्द करा. 

(२) विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. शिक्षणावर होणाऱ्या एकूण खर्चामध्ये वाढ करा. 

(३) मागील व चालू वर्षाचे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा.

(४) वसतिगृह प्रवेशप्रक्रिया त्वरित राबवून विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करा. 

(५) विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती, फेलोशीप, स्वाधार योजनेची रक्कम त्वरित वितरीत करा. 

(६) सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत बसपास आणि रेल्वेपास देण्यात यावा. 

(७) ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांसाठी घोषित वसतिगृहे त्वरित सुरु करा.


या आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे, तालुका सचिव अभिषेक शिंदे, शिवा चव्हाण, रामेश्वर आठवले, निखील शिंदे, शंकर चव्हाण, गोपाल निरडे, भानुदास डोईफोडे, गणेश कोकणे, आकाश जाधव, नारायण डोईफोडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा