Breakingविशेष लेख : घटस्थापना-अमृतघट भरले तुझ्या घरी, का वण वण फिरशी बाजारी? - क्रांतिकुमार कडुलकरभारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे आपले सण ही कृषी संस्कृती जागवणारे असतात. सर्वत्र हिरवाई असते, निसर्गाचे मनोहर रूप डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. या अश्विन महिन्यात शेतात आलेल्या धान्याची कापणी सुरू होते. त्यामुळे हे सुगीचे दिवस असतात. या काळाला निर्मिती शक्तीचा काळ असे म्हणतात. आणि या काळाशी शेतकर्‍यांचे आणि साहजिकच प्रत्येकाचे नाते जोडलेले असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला दुर्गादेवीची म्हणजे आदिशक्तीची – निर्मिती शक्तीची पूजा केली जाते.


पृथ्वीच्या निर्मिती शक्तीचा नवरात्र हा एक उत्सव सुरू होतो. नवरात्री हा नवनिर्मितीचा, सृजनाचा उत्सव मानून त्यात मातृशक्तीची पूजा करण्याची आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. घटस्थापना म्हणजे चौरंगावर मातीचा घट ठेऊन त्यामध्ये माती, पाणी घालून धान्य पेरले जाते या घटाची पूजा अर्थात घटस्थापना.


अश्विन शुद्ध प्रतिपदेला या नऊ दिवसांच्या उत्सवाची सुरवात होते. हिंदू धर्मात नऊ या अंकास अतिशय महत्व आले, बाळाचा जन्म ही नऊ महिने, नऊ दिवस, नऊ तास, नऊ क्षण या काल चक्रानुसार होतो. नवनिर्मिती करणार्‍या सर्व संख्यांमध्ये नऊ ही संख्या सर्वात मोठी आहे. धान्य पेरल्यानंतर ते उगवायला, रोप अंकुरायला सुद्धा नऊ दिवस लागतात. मानवी संस्कृतीतील जीवनात नऊ रंग, नऊ रस असतात, म्हणून नवरात्र हा नवनिर्मितीचा उत्सव आहे. बर्‍याचदा लोकांना केवळ देवीच्या उत्सवाबाबत माहीत असते. मात्र नक्की नवरात्र अथवा आपले या नवनिर्मितीशी काय नाते असते याची जराही माहिती नसते. वास्तविक ही सृजनशीलता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची असते. घटस्थापना आणि हिरवे अंकुर याचा निर्मितीशी संबंध आहे. जगातील सर्व संस्कृतीत स्त्रियांनी प्रथम मातीत बीजांकुर पेरले, शेतीचा शोध लावला कारण टोळ्यांचे नायक शिकार आणि लढाया करत होते. आदीकाळापासून स्रियांनी पशुपालन आणि शेती, आणि मातीच्या भांड्याचा शोध लावला आहे. त्यामुळे पूर्वी मातीचे कलश डोईवर स्त्रिया शेतामध्ये कामासाठी जात होत्या. काखेत भाकरी भाजी आणि डोईवर पाण्याचा घडा घेऊन पतीराजाला भर उन्हात घास भरवत होत्या. शेतात कापणी मळणी करणारा कष्टकरी भर उन्हात चटणी भाकर खाताना मातीच्या घड्यातले पाणी अमृत समजून पीत होता.


कुलदैवतेसमोर घरामध्ये फ्लॅट मध्ये घटस्थापना करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी स्त्रीया आजही भारतीय संस्कृतीतील घटस्थापना आणि शारदीय नवरात्र आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करतात.


हा आधुनिक काळ आहे. माणसं आनंदाच्या शोधात आहेत, कोणाच्या चेहऱ्यावर समाधान आहे का?भौतिक सुखे घरात आहेत. तरीही माणूस सुखी नाही. आकाशात पहाटे उगवणाऱ्या सूर्याचे दर्शन तो घेत नाही. तांबूस सोनेरी आभाळाची लाली सुखदायक असते, त्यातही तो आनंद घेत नाही. पुरुष कधीच समाधानी नसतो, चंचल असतो. आजच्या विज्ञानयुगात सुख म्हणजे काय असते, हेच त्याला माहित नसते. आनंद घरात आहे. आनंद घरच्या लक्ष्मीच्या स्मित हास्यात आहे. परमानंद तिने गॅलरीत लावलेल्या कुंड्यातील मनी प्लॅन्ट मध्ये आहे. ब्रम्हानंद कामावरून थकून आल्यावर तिने आपल्यासमोर न मागता दिलेल्या चहा कॉफी मध्ये आहे. परमानंद तिने चौरंगावर मांडलेल्या घटस्थापने मध्ये आहे. म्हणून कवी बा.भ.बोरकर यांनी एका कवितेत "अमृतघट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरशी बाजारी" असे म्हटले आहे.


नवरात्र हा दुर्गादेवीचा उत्सव आहे. स्त्रीमध्ये सृजनाची, नवनिर्माणाची क्षमता असते. म्हणूनच आपण स्त्रीला निर्मितीशक्ती मानतो. जगातील महान इतिहास प्रसिद्ध युगपुरुषांनी स्त्रीच्या उदरात जन्म घेतला आहे. वैदिक कालखंड हा कृषी कालखंड होता. लोककला, लोकनृत्य, शाहिरी, भजन, कीर्तने, हरिपाठ, पारायणे सुरू घटस्थापनेपासून सुरू होतात. परतीचा पाऊस गेलेला असायचा, अलीकडे काही वर्षात परतीचा पाऊस नवरात्रात पण येतो. तरी सुद्धा घटस्थापनेपासून चराचरात चैतन्य निर्माण होते. म्हणून नवरात्र हा उत्सव चैतन्याचा, मातृत्वाचा आदर करणारा अर्थात स्त्रीचा आदर करणारा उत्सव आहे. निसर्गात असणारे सूर्य, चंद्र, नद्या, समुद्र, पर्वत, झाडे, वेली, ऊन, वारा, पाऊस यांच्यामध्ये एक शक्ती आहे. तिच्यामुळेच सजीवांना जीवन जगणे शक्य असते. त्या आदिशक्तीची पूजा आपल्याकडे हजारो वर्षांपासून होत आहे. हजारो वर्षांच्या परिवर्तनाच्या या काळात हजारो संकटावर मात करून मानवी जीवन समृद्धीकडे वाटचाल करत असते.


स्त्रियांना स्वच्छता फार आवडत असते, आळशी पुरुषांनी अंग झटकून घरातील आणि परिसरातील केर कचरा काढावा, आपल्या स्वत:मधले आळस, उद्धटपणा, मत्सर, द्वेष, राग हे दुर्गुणही नाहीसे करावेत. असा संदेश नवरात्र देत असते.


निर्मिती शक्तीशी आपले नाते हे एका तर्‍हेने जन्मापासूनच जोडले जाते. कारण आपली निर्मिती करणारी आपली माता जन्मापासूनच आपल्याला हे नाते शिकवत असते. या निर्मितीशक्तीचा आदर करता यायला हवा. तरच या नात्याचा योग्य आदर होऊ शकतो. मातृत्वाची, सृजनाची प्रेरणा देणाऱ्या नवरात्रीचा हा उत्सव आदिवासी पाड्या पासून शहरातील नगर, वस्तीपर्यंत साजरा केला जातो. आपल्या जन्मापासून निसर्गाशी नाते जुळलेले असते, आपल्या निर्मिती शक्तीशी आणि सणाशी हे नाते कसे जपायचे हे सर्वस्वी आपल्या वागण्यावर अवलंबून आहे.


आपण निसर्ग प्रिय, समाज प्रिय राहिले पाहिजे. आजही खेड्यातील अंगणात पक्षी निर्भय पणे धान्य वेचायला येतात. शहरातील आपल्या घराच्या गॅलरीत चिमण्या चिव चिव करत याव्यात, आणि आमच्या शहरात पक्षांना भयमुक्त खिडक्या आहेत. आमची शहरे पर्यावरण पूरक असतील, आम्ही आमच्या परिवारातील सर्वांबरोबर आनंद मिळवू, असा विश्वास व्यक्त करून नवरात्रीचे स्वागत करूया.


- क्रांतिकुमार कडुलकर

- पिंपरी चिंचवड

(लेखक हे सामाजिक कार्यकर्ते आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा