Breaking


रामायणातील बाल काण्डाच्या सांगतेनिमित्त वडवणीत भव्य श्रीराम रथयात्रा संपन्नजय श्रीरामच्या जयघोषाने अवघा आसमंत निनादला 


वडवणी, दि.१० : वडवणी येथील श्री रेणुकामाता संस्थान, चिंचवण रोड वडवणी या ठिकाणी दि.१४ ऑक्टोबर पासून भावार्थ रामायण कथा यांस प्रारंभ झाला असून या रामायणातील पहिले बालकाण्ड याची सांगता बुधवार १० नोव्हेंबर रोजी करण्यात आली. याप्रसंगी संपूर्ण वडवणी शहरातून भव्य श्रीराम रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रे दरम्यान जय श्रीरामच्या गर्जनेने अवघा आसमंत निनादून गेल्याचे पहावयास मिळाले. असंख्य श्रीराम भक्तांनी यावेळी आपली उपस्थिती दर्शविली होती. दुपारी महाप्रसादाने याची सांगता झाली.


वडवणी येथील चिंचवण रोडवरील श्री रेणुका माता संस्थान याठिकाणी दिनांक १४ ऑक्टोबर विजयादशमी दसरा दिनापासून भावार्थ रामायण कथेस प्रारंभ झालेला असून या रामायण कथेसाठी वाचक म्हणून परशुराम महाराज दुटाळ तर सुचक म्हणून बाबासाहेब महाराज आंधळे हे दैनंदिन रामायण कथेचे वाचन व विस्तृत वर्णन करत आहेत. संपुर्ण रामायणामध्ये रामायणाचे सात काण्ड असून यामध्ये बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड, युध्दकाण्ड (लक्ष्मण शक्ती), उत्तर काण्ड असे एकूण सात काण्ड आहेत. पैकी पहिले बालकाण्डाची सांगता काल दिनांक १० नोव्हेंबर बुधवार रोजी झाली. 


यानिमित्त आयोजक श्री रेणुकामाता संस्थान यांच्यावतीने संपूर्ण वडवणी शहरातून भव्य दिव्य श्रीराम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर रथयात्रेस सकाळी ८ वाजता श्री रेणुकामाता संस्थान या ठिकाणाहून सुरुवात झाली. पुढे चिंचवण रोड, मारोती मंदिर, गणपती मंदिर, श्रीराम मंदिर, काळा हनुमान मंदिर ते वापस संस्थान अशा स्वरुपाची ही रथयात्रा संपन्न झाली. या रथयात्रेत वडवणी सह पंचक्रोशीतील श्रीराम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रथयात्रेत टाळ-मृदुंगाच्या गजरात व श्रीराम नामाच्या जयघोषात सर्वजण भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यानंतर दुपारी १२ ते २ यावेळेत भावार्थ रामायण वाचन बालकाण्ड सांगता हे संपन्न झाले. त्यानंतर लागलीच दुपारी २ वाजता कदम पाटील परिवार व लांडे पाटील परिवार वडवणी यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा समस्त भाविक भक्तांनी लाभ घेतला. श्री रेणुकामाता संस्थान या ठिकाणी दैनंदिन भावार्थ रामायण कथेचे आयोजन दररोज रात्री ०७;३० वाजता करण्यात आलेले असून तरी परिसरातील सर्व श्रीराम भक्तांनी व भाविक भक्तांनी या दैनंदिन भावार्थ रामायण कथेचा श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प.अण्णा महाराज दुटाळ यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा