Breaking

लाल परीच्या संपास सीटूचा सक्रिय पाठिंबा; मागण्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू !


कॉ.उज्वला पडलवार व कॉ.गंगाधर गायकवाड यांचा इशारा !

 
नांदेड : मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात सार्वजनिक प्रवासी बस वाहतूकीच्या खाजगीकरणाच्या राजकीय व शासकीय धोरणातून एसटीचे राज्य शासनात विलीनकरण झाल्यास जनतेचा  १७% प्रवासी कर रद्द होणार आहे. असे होणारे अनेक फायदे लक्षात घेता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने आज एस.टी. च्या संपास समर्थन देण्याची गरज आहे असे आवाहन सीटू कामगार संघटनेच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार व जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी नांदेड मध्यवर्ती बस स्थानकात सुरू असलेल्या आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन केले आहे तसेच सीटू नांदेड समितीच्या वतीने मुख्यमंत्री नामदार ऊद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिस्तीच्या नावाखाली संपात सामील असणाऱ्या कोणत्याही एस.टी.कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू नये अशी मागणी अध्यक्ष व सरचिटणीस यांनी लेखी स्वरूपात केली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने शासकीय सेवेत सामावून घेतल्यास महाराष्ट्राचा व जनतेचा फायदाच होणार आहे अशी लक्षवेधी उदाहरणे देण्याचा प्रयत्न सीटू नांदेड जिल्हा समितीने केला आहे. उदाहरणार्थ १७ % प्रवाशी कर रद्द होईल.

सार्वजनिक मालमत्ता कवडीमोल किमतीत विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला असून त्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील  त्रिपक्षीय महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचे प्रथम दर्शीनी चित्र आहे. ऐन दिवाळी सारख्या महत्वपूर्ण सनासुदीच्या काळात ३५ पेक्षा अधिक एस.टी.कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली आहे. त्या कुटुंबातील सदस्यांची काय परिस्थिती  असेल असे गंभीर प्रश्न चर्चेत असताना केंद्रातील व राज्यातील सताधारी सहानुभूतीचे ढोंग करीत संपास पाठिंबा देऊन एकमेकावर चिखलफेक करून घेत आहेत. हे कृत्य निंदनिय असून त्या त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीनी आपल्या पक्षाच्या वतीने एस.टी.कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाच्या मागण्या सभागृहात मांडून एस.टी.कर्मचाऱ्यांना साथ देण्याची गरज आहे. जसे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ.विनोद निकोले यांनी प्रत्यक्षात ते कार्य केले आहे. आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सेवेत सामावून घेतल्यास महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणात लाभच मिळणार आहे. त्या मध्ये एस.टी.ला टोल टॅक्स द्यावा लागणार नाही. म्हणजेच एसटीचे वर्षाला ३५०० करोड रुपये वाचतील, डिझेल वरील कर जो की महाराष्ट्र सरकारचा २७ % आहे तो रद्द होईल.
वरील सर्व पैसा वाचला म्हणजे तिकीट दरात जवळपास ४०% कपात होऊ शकेल. म्हणजेच जिथे १०० रुपयाचे तिकीट आहे तिथे केवळ  ६०  रुपयेच द्यावे लागणार आहेत.

त्यामुळे प्रवाशी मायबाप जनता या महागाईच्या काळात आपला जर एवढा पैसा वाचणार असेल तर आपणही आपल्याला जमेल त्या प्रमाणे शासन दरबारी ही गोर गरीब जनतेची हक्काची असलेली एसटी राज्य शासनात विलीन करण्यासाठी हातभार लावावा आणि आज जो काही एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरून लढत आहे त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन सीटूच्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार व जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मध्यवर्ती बस स्थानक येथे सुरू असलेल्या आंदोलनात केले आहे. तात्काळ तोडगा काढून राज्य सरकारने निर्णय घ्यावा व एस.टी.कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये अन्यथा आम्हालाही एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सीटूच्या वतीने दिनांक १० नोव्हेंबर रोजी नांदेड मध्ये दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा