Breaking


रेशन वाटप प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन करण्याची बिरसा फायटर्सची मागणीरत्नागिरी : गावात नेटवर्क नसल्याने व पाॅस मशीनवर अंगठे उमटत नसल्याने कुडावडे आदिवासी बांधवांना रेशन पासून वंचित राहावे लागत आहे. म्हणून सध्याची ऑनलाईन अंगठे पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन रेशन कार्ड पद्धतीने रेशन वाटप करण्यात यावे, अशी मागणी दापोलीचे तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे बिरसा फायटर्स संघटनेतर्फे करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, शासनाने अंगठ्याद्वारे रेशन देणे प्रक्रिया सध्या सुरू केलेली आहे. परंतु कुडावडे आदिवासी वाडीतील बरेच लाभार्थी यांचे पाॅस मशीनवर ठसे उमटत नसल्याने रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. अनेक लाभार्थींना रेशन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून सध्याची ऑनलाईन अंगठे घेण्याची पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन रेशन कार्ड पावती पद्धतीनेच रेशन देण्यात यावे  अशी मागणी करण्यात आली. 


तहसीलदार वैशाली पाटील यांची 30 ते 35 आदिवासी बांधवांनी भेट घेतली व आपली समस्या सांगितली. तहसीलदार वैशाली पाटील यांनी मनोज राऊत पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना बोलावून रेशन बाबतची आदिवासी बांधवांची समस्या सोडवण्यासाठी निर्देश दिले. कुडावळे गावात नेटवर्क अडचण असल्यामुळे आता पोलीस पाटील यांच्या अंगठ्याच्या मदतीने समस्या ग्रस्त सर्व आदिवासी बांधवांना रेशन देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आपण पत्राद्वारे कळविले असून जिल्ह्याहून अजून याबाबत कार्यवाहीचे पत्र आलेले नाही. लवकरच यावर पर्यायी व्यवस्था निर्माण करून आदिवासी बांधवांना रेशन दिले जाईल, अशी माहिती तहसीलदार यांनी दिली. आदिवासी बांधवांच्या रेशनबाबतच्या समस्या सोडवण्याचे काम मनोज राऊत पुरवठा निरीक्षण अधिकारी दापोली यांनी हाती घेतले आहे. लवकरच सर्वांच्या समस्या सोडवू, असे यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी राऊत यांनी सांगितले.


तहसिल कार्यालय परिसरात आदिवासी बांधवांनी एकदम प्रवेश केल्याने व  गर्दी वाढल्याने मोर्च्याचे स्वरूप प्राप्त झाले. सुशिलकुमार पावरा व चंद्रभागा पवार यांनी तहसिल कार्यालयात आदिवासी लोकांचा मोर्चा आणल्याची कुजबूज लोकांत सुरू होती. निवेदन देते वेळी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, चंद्रभागा पवार राज्य महिला प्रतिनिधी, संतोषी पवार, हिरा पवार, मंजूना पवार, सुनीता पवार, अल्का जाधव, गुशी पवार, अंकिता वाघमारे, वनिता पवार, किरा जाधव, भाई जाधव, शेवंता वाघमारे आदिवासी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा