Breaking


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन



मुंबई, दि. १० : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरीने प्रयत्न करत असल्याचे सरकार कडून सांगण्यात येत आहे. आता हा संप मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकऱ्यांना कळकळेची विनंती केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.


अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही करोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसा बसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.


राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या. असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.


अधिक वाचा :

प्राध्यापकांची २०८८, प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता, इतरही घेतले महत्त्वाचे निर्णय



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा