Breaking


डॉ अशोक थोरात यांची धारुर तालुका सचिवपदी फेरनिवडमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी व कामगारांच्या प्रश्नाशी बांधील असल्यामुळे वेगळा आहे - अजय बुरांडे


धारूर : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) धारूर तालुक्याचे ३ रे तालुका अधिवेशन कॉ. भागवत मास्तर काका नखाते सभागृहात व कॉ. मोतीराम जगताप मंच गांजपुर, धारूर येथे मंगळवार  १६ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात तालुका सचिव म्हणून एकमताने डॉ. अशोक थोरात यांची फेरनिवड करण्यात आली. 


यावेळी अध्यक्षीय समारोपात जिल्हा सचिव अॅड. अजय बुरांडे यांनी असे सांगितले की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इतर पक्षापेक्षा वेगळा आहे. कारण शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक यांच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष करणारा व बांधिलकी असणारा पक्ष आहे.


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे धारूर तालुका त्रेवार्षीय ३ रे अधिवेशन गांजपुर येथे झाले. या अधिवेशनाची सुरुवात जेष्ठ कॉ. रामधन डापकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून झाली. या अधिवेशनाला  मार्गदर्शक म्हणुन पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अॅड. अजय बुरांडे, जेष्ठ नेते कॉ. पाडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके हे उपस्थित होते. या अधिवेशनाचे उद्घाटनपर मार्गदर्शन करताना कॉ. पाडुरंग राठोड यांनी असे सांगितले की, अच्छे दिनाच्या नावाखाली केंद्र शासनाने नोटा बंदी, रेल्वेचे, विमानाचे, कोळसा खाणीसह अनेक उद्योगांचे कंपन्यांचे खाजगीकरण करून बड्या भांडवलदाराच्या घशात घातले आहे. शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे आणून जनतेची फसवणूक केली आहे, असे मत त्यांनी मांडले. 


तालुका सचिव यांनी मागील तीन वर्षाचा लेखी अहवाल प्रतिनिधी समोर मांडला, एकमताने मंजुर करण्यात आला पुढील तीन वर्षासाठी नवीन ९ जनांची तालुका कमिटी निवडण्यात आली. यामध्ये कॉ. काशिराम सिरसट, कॉ.डॉ. अशोक थोरात, कॉ. मोहन लांब, कॉ. मिरा शिंदे, कॉ. ज्ञानदेव बोराडे, कॉ. मनिषा करपे, कॉ.अॅड. संजय चोले, कॉ. मधुकर चव्हाण, कॉ. मेघराज तिडके यांची निवड होऊन  तालुका सचिव कॉ.डॉ. अशोक थोरात यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. या नविन तालुका कमिटीला मार्गदर्शक कॉ. दत्ता डाके यांनी केले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सुशेन सिरसट, भास्कर डापकर, कमलाकर सोंळके, सचिन घोळवे, उर्मिला सिरसट, कल्पना सिरसट, कानुपात्रा शिंदे परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा