Breaking




क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना भारतरत्न द्या - बिरसा फायटर्सची मागणी


राष्ट्रपती व पंतप्रधान यांना बिरसा फायटर्सचे निवेदन


रत्नागिरी : जननायक बिरसा मुंडा यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केन्द्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे एका निवेद्नाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या  बलिदानाला खूप महत्त्व आहे. आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आहे. बिरसा मुंडा यांनी  1857 पूर्वी झालेल्या आदिवासी उठावाचे सूत्र पकडून वर्तमानातील अत्याचाराला वाचा फोडत भविष्याचा वेध घेतला. आपले जन आंदोलन गतीमान केले. बिरसा मुंडा यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक व धार्मिक आंदोलन केले. बिरसा मुंडा हे आदिवासी अस्मिता व अस्तित्व शोधण्याचे प्रबळ कारण आहे. म्हणून 15 नोव्हेंबर 1989 रोजी भारत सरकारने बिरसा मुंडा यांचे पोस्टाचे तिकीट काढले.16 ऑक्टोबर 1989 ला बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे भारतीय संसदेत अनावरण करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती के.एन.नारायण यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 1998 ला भारतीय संसदेच्या आवारात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. परंतु आजही आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्यास सरकारकडून दिरंगाई करण्यात येते. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. यातून सरकार हे आदिवासी समाजाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे कार्य बघून लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला आहे. त्यांचा जन्म झारखंडमधील उलीहातू या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्यांनी आपल्या आदिवासी सहका-यांच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात छोटा नागपूर श्रेत्रात इ.स.1895 साली लढा उभारला. इंग्रजांविरोधात लढताना त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले व तुरूंगात इंग्रजांनी त्यांचा खूप छळ केला. 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची तुरूगांत मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांनी 19 व्या शतकाच्या शेवटच्या वर्षात आदिवासीं द्वारा इंग्रज सरकारच्या विरोधात जन आंदोलन उभारले.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या आदिवासी संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच आहे.आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत, ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.

बिरसा मुंडा हे आज आदिवासी युवकांचे प्रेरणास्थान आहे. संपूर्ण आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना दैवत मानू लागला आहे. बिरसा मुंडा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू लागला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आहूती दिलेल्या या भारतमातेच्या पुत्राचे सन्मान होणे अत्यंत  आवश्यक आहे. म्हणून भारत सरकारने जननायक बिरसा मुंडा यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन  सन्मान करावा. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने भारत सरकारकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा