Breaking


1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा - बाळासाहेब लांघी


पुणे : जुन्नर व आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंचर प्रांताधिकारी कार्यालयावर आज सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आले. व त्याचाच एक भाग म्हणून जुन्नर व आंबेगाव शिक्षक समितीच्या वतीने मंचर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर प्राथमिक शिक्षक समितीचे वतीने आज दुपारी एक ते चार या वेळेत धरणे आंदोलन आयोजित केले होते.

या आंदोलनामध्ये प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावा मागासवर्गीय आणि दारिद्र्य रेषेखालील मुलींना उपस्थिती भत्ता एक रुपये ऐवजी पंचवीस रुपये करण्यात यावा, शिक्षण सेवक यांचे मानधन सहा हजार रुपये वरून पंचवीस हजार रुपये करण्यात यावे, सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या व पदवीधर शिक्षकांच्या बाबतल्या त्रुटी दूर कराव्यात, वस्तीशाळा व अप्रशिक्षित शिक्षण सेवकांची शिक्षकांची सुरुवातीची नियुक्ती तारीख त्यांच्या सर्व लाभासाठी धरण्यात यावी,

डीसीपीएस (DCPS) शिक्षकांच्या पगारातून कापून गेलेल्या रकमांचा हिशोबातील घोळ पूर्ण करून पूर्ण हिशोब द्यावा, 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, 13 ऑक्टोबर 2016 चे परिपत्रक रद्द करून सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी, जून 2014 ची अधिसूचना रद्द करून केंद्रप्रमुखाच्या सर्व रिक्त जागा शिक्षकांमधूनच भरण्यात याव्यात, ग्रामीण भागात मुख्यालयी राहण्याचे 09 सप्टेंबर 2019 चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, एम एस सी आय टी (MSCIT) परीक्षेला मुदतवाढ मिळावी, आंतरजिल्हा बदली मधील जाचक अटी रद्द करून आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही तातडीने करावी तसेच दरमहा उशिरा होणारे पगार 1 तारखेला करण्यात यावेत, या प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. प्रांताधिकारी सारंग कोडीलकर यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

यावेळी जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी, जिल्हा उपाध्यक्ष नारायण मराडे, जुन्नरचे नेते नामदेव मुंढे, जिल्हा सरचिटणीस राजेश ढोबळे, आंबेगावचे सरचिटणीस राजेंद्र शेळकंदे, सुरेश गभाले, आंबेगावचे नेते सुरेश लोहकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेगावचे अध्यक्ष ठकसेन गवारी यांनी केले तर आभार जिल्हा प्रतिनिधी संतोष राक्षे यांनी मानले यावेळी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शिक्षक समितीचे असंख्य कार्यकर्ते धरणे आंदोलनास उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा