Breaking

जुन्नर : माळशेज घाटात कार दरीत कोसळली


जुन्नर : कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले. दरीत कोसळल्यानंतर कारने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. 


आज ( दि . ७ ) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात महिला जागीच ठार झाली. गाडीतील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. माळशेज घाटातील लाजवंती पॉईंट जवळ इको कार ( एम.एच .०५ ई . क्यु . १६६३ ) च्या चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर गाडीने पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली असल्याचे समजते.

या दुर्घटनेत सखुबाई उगले ( वय ५५ ) ही महिला ठार झाली. उषा सूर्यकांत कोकणे, उर्मिला चंद्रकांत लागे, पांडुरंग नामदेव मिलखे, सोनाली गणेश काटे, ऋषीकेश सूर्यकांत कोकणे ( सर्वांचा पत्ता माहित नाही ) व चालक आकाश शंकर गेगजे ( रा . कल्याण ) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगसाठी जात असलेल्या औरंगाबाद येथील ट्रेकर्सनी घटनास्थळी वेळीच धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले. यामुळे सहा जणांचे जीव वाचवण्यात यश आले. गाडीतील सर्वजण कल्याणहून माळशेज घाटमार्गे वाडा ( ता . खेड, जि. पुणे ) येथे जात असताना हा अपघात घडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा