Breaking
जुन्नर : कालव्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान !


नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील येडगाव नारायणगाव शिवेवर अंबादास उर्फ लक्ष्मण दत्तात्रय वाजगे यांच्या शेताजवळ असलेल्या डिंभा डाव्या कालव्यामध्ये सुमारे एक ते दीड महिने वयाच्या बिबट्याचा बछडा येथील शेतमजूर देविदास लहानु केदार यांना आढळला. 


आज सकाळी सकाळी शेतावर कामाला जात असताना देविदास केदार यांना बिबट्याच्या बछड्याचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी कॅनॉलमध्ये उतरून पाहिले असता त्यांना हा बछडा पाण्यात भिजलेल्या अवस्थेत आढळला.

त्यांनी तात्काळ वन विभाग व बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. यानंतर येथील रेस्क्यू टीम चे सदस्य किरण वाजगे व रमेश सोलाट यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या बछड्याला ताब्यात घेऊन येथील वनपाल मनीषा काळे यांच्याकडे सुपूर्द केले. 

यावेळी रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे तसेच वनपाल मनिषा काळे यांनी या बछड्याला सिरींज ने पाणीदेखील पाजले. व माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रामध्ये या बछड्याला पुढील उपचारासाठी दाखल केले.

पंधरा दिवसांपूर्वी देखील या ठिकाणी वाजगे यांच्या उसाच्या शेतामधून दोन बिबट्याचे बछडे खेळत खेळत येथील शेतमजुरांच्या अंगणात आले होते. तसेच काल दिनांक २८ रोजी एक बिबट्याचा बछडा शंभर मीटर अंतरावर आढळला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा