Breaking


पिंपरी चिंचवडमध्ये कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलनकंगना राणावत आणि गोखले यांचे चित्रपट पिंपरी चिंचवडमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही - डॉ. कैलास कदम


पिंपरी, दि. १७ : भारतीय स्वातंत्र लढ्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावतचे आणि तिचे समर्थन करणाऱ्या विक्रम गोखले यांचे चित्रपट पिंपरी चिंचवड शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास माहित नसणाऱ्या बालिश कंगना राणावतचे समर्थन करणाऱ्या विक्रम गोखले यांचाही केंद्र सरकारने पुरस्कार देऊन गौरव करावा अशी उपरोधिक टीका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.


पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राणावत व गोखले यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे, पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महापौर कविचंद भाट तसेच ज्येष्ठ नेते पांडूरंग गडेकर, विजय ओव्हाळ, ज्ञानेश्वर मलशेट्टी, हिराचंद जाधव, आबा खराडे, के. एम. रॉय, के. हरि नारायण, इस्माईल संगम, रोहित भाट, विश्वनाथ जगताप, नयन पांलाडे, रोहित तिकोणे, छायाताई देसले, पूजाताई बिबवे, कबीर मोहम्मद, हमीद इनामदार, बाबा बनसोडे, बाबा गायसमुद्रे, विशाल सरवदे आदी उपस्थित होते.


यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र लढ्याचे नेतृत्व केले. १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले असून यापुर्वी हजारो क्रांतीकारकांनी स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. पिंपरी चिंचवड मधील चापेकर बंधू तसेच क्रांतीवीर सुखदेव, भगतसिंग, राजगुरु अशा युवकांनी भारत मातेचा जयघोष करीत ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरुध्द लढत फाशीचा मार्ग स्विकारला. अशा लाखो क्रांतीकारकांचा अपमान करणारे बेताल वक्तव्य कंगना राणावतने केले. तिचा आणि तिचे समर्थन करणाऱ्या विक्रम गोखले यांचा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध डॉ. कैलास कदम यांनी केला. तसेच उपस्थितांनी राणावत, गोखले यांच्यासह केंद्र सरकारचाही निषेध केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा