Breaking


प्राध्यापकांनी स्वतःला संशोधनासाठी झोकून द्यावे - डॉ.आर.एस. माळी



चिंचवड, ता. ७ : संशोधन ही निरंतर प्रक्रिया असते, संशोधनासाठी वेळ, परिश्रम आणि बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो, प्राध्यापकांनी स्वतःला झोकून दिले तर भारत देश संशोधनामध्ये आघाडीवर येऊ शकतो असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांनी केले.


प्रतिभा महाविद्यालयाच्या दिवाळी स्नेहमिलन आणि पीएचडी प्राप्त प्राध्यापकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. दिवाळी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अंध चार्टर्ड अकाउंटंट स्वरभूषण तोष्णीवाल यांच्या संगीत संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी जल्लोष २०२१ हा कार्यक्रम सादर करून आपल्या विविध गुणदर्शनाचे प्रदर्शन केले.


कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांनी रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. विविध विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केलेल्या महाविद्यालयातील २४ प्राध्यापकांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


नाशिक येथील ब्लाइंड असोसिएशन ऑफ इंडियन्स यांचे अध्यक्ष अरुण भास्कर यांनी ब्रेल लिपीत लिहिलेल्या नि:शब्द या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याच संस्थेच्या वतीने डॉ. दीपक शहा आणि डॉ. रूपा शहा यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आले. तसेच डॉ. दीपक शहा यांचे पीएचडीचे मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कांकरिया यांनाही गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लायन इंटरनॅशनलचे संचालक नरेंद्र भंडारी, माजी आमदार बाळासाहेब भेगडे, कुलदीप रावल, परमानंद शर्मा, माजी प्रान्तपाल रमेश शहा, प्रशांत शहा, सुनील चेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी केले आणि डॉ. पौर्णिमा कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, शशिकला शहा, संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनीता कुर्‍हाडे, प्राचार्या सविता ट्रॅविस, शैलेश शहा, डॉ. सुशील मुथियान, दिलीप पारेख, राजेश म्हस्के, संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा