Breaking


एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम ; नागरिकांच्या मनात काय ?पिंपरी चिंचवड, ता.१० : राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय.


पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सुट्टीच्या दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाजवी दरामध्ये घरी पोचवणारी एसटी आणि तिच्या कामगारांबद्दल जनतेमध्ये खूप मोठी सहानुभूती शहरात आहे.


एसटी महामंडळाकडे १६ हजाराहून जास्त बसगाड्या आहेत. एसटीचे एक लाखाहून जास्त कर्मचारी आहेत, ते ३१ विभागातून संपूर्ण महाराष्ट्र तसेच गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यात प्रवासी सेवा देतात.


एसटीच्या संपाबाबत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक काय म्हणतात पाहुयात


समाजातील अपंग, मूकबधिर नागरिकांना एसटी सवलतीची प्रवासी सेवा देते. एसटीच्या भरवशावर अपंग नोकरी धंदा करत असतात. आज संपाचा फायदा घेऊन पाचपटीने खाजगी बस चालक लुटत आहेत. एसटी कर्मचारी इमानदार सेवक आहेत. त्यांच्या आर्थिक मागण्या पूर्ण करायला हव्यात.

- स्मिता सस्ते (अपंग, मोशी)


सरकारची ही हक्काची ही प्रवासी सेवा आहे. विद्यार्थी, कामगार जेष्ठ नागरिक यांना विश्वासाने इच्छित स्थळी पोचवणारी एसटी सारखी सेवा नाही. रातराणीचा एसटीचा प्रवास महिला प्रवाशांना खात्रीशीर वाटतो. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा तुटपुंजा पगार सरकारने वाढवावा.

- राजू सुतार (कामगार, रावेत)


सरकारने खाजगी प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर एसटी तोट्यात गेली. जेष्ठ नागरिकांना खाजगीकारणांमध्ये सवलती मिळणार नाहीत. माझे वडील कंडक्टर होते. गाव तेथे एसटी या धोरणामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीत एसटीचा मोलाचा वाटा आहे. आता एसटीच्या अपघाताचे प्रमाण कमी आहेत. ड्रायव्हर, कंडक्टर आजही प्रवाशांचे ईश्वर आहेत.

- सलीम सय्यद (जेष्ठ नागरिक, चिंचवड गाव)


कराड शहरातून मी पिंपरी चिंचवड येथे नातेवाईकांना आणि नोकरी करत असलेल्या माझ्या मुलाला भेटण्यासाठी मी एसटीने येते. एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर हे माझ्या भावासारखे आहेत. सरकारने त्यांचे पगार वाढवून त्यांची गरिबी हटवावी.

- अरुणा पानशेट्टी (चिखली प्राधिकरण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा