Breaking


एसटी कर्मचारी मस्तवाल सरकारला खुर्चीतुन खाली खेचतील : बाबा कांबळे


कर्मचाऱ्यांचे एसटी आगारातुन साहित्य बाहेर काढल्याचा तीव्र निषेध !


पुणे : शिवाजीनगर एसटी स्टँड आगारामधील एसटी कर्मचारी, महिलावर्ग यांचे निवासस्थान सीलबंद केले. त्यांना एसटी आगाराच्या बाहेर सामान सहित काढण्याचा अत्यंत निर्लज्जपणा सरकारने केला आहे. ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांचे साहित्य बाहेर काढणाऱ्या मस्तवाल सरकारला महाराष्ट्रातिल जनता  खुर्चीतून खाली खेचतील असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पदाधिकाऱ्यांनी संत तुकारामनगर, शिवाजीनगर व स्वारगेट बस आगारातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आंदोलनामध्ये सहभाग घेतला. यावेळी शिवाजीनगर बस आगारातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासीगृह सील करून कर्मचाऱ्यांचे सामान बाहेर काढण्यात आले. याबद्दल बाबा कांबळे यांच्या शिष्टमंडळाने आगारप्रमुख यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. व या प्रकरणाचा जाब विचारला. या वेळी आम्हाला वरिष्ठ पातळीवरून आदेश आले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिष्टमंडळात शिवाजीनगर महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष संतोष डोंबाळे, दत्ता पाटील, व रिक्षा चालक सहभागी होते.


या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळामध्ये बहुजन समाजातील लोकप्रिय नेत्यांवर देखील अन्याय करण्यात आला होता. संबंधित लोकप्रतिनिधींचे घरातील साहित्य अन्यायकारक पद्धतीने बाहेर काढून अपमानास्पद वागणुक दिली. त्याविरोधात देशभर संतापाची लाट आली होती. लोकांनी निवडणुक हातात घेऊन काँग्रेस सरकारला सत्तेबाहेर केले. सध्याचे राज्य सरकार त्याच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करताना दिसत आहे. 

साहित्य बाहेर काढून अपमानास्पद वागवले आहे. येणाऱ्या निवडणूकीत महाराष्ट्रातील लाल परी वर प्रेम करणारी सर्वसामान्य जनता व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय सत्ताधाऱ्यांना धुळ चारल्याशिवाय राहणार नाहीत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर होणारी निलंबनाची कारवाई मानवतेला काळिमा फासणारी आहे. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांनी या मध्ये लक्ष घालून तोडगा काढावा. अन्यथा एसटी कर्मचारी, रिक्षा चालक व मालक सत्ताधाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा