Breaking


भूमिहीनांना व शेतकऱ्यांना न्याय देणारे ठराव करीत माकपचे 9 वे यवतमाळ जिल्हा अधिवेशन संपन्न


तिसऱ्यांदा कुमार मोहरमपुरी यांची जिल्हा सचिवपदी निवड 


वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दर तीन वर्षांनी होणारे जिल्हा अधिवेशन वणी येथील कॉम्रेड नानाजी टेकाम सभागृह (शेतकरी मंदिर) येथे घेण्यात येऊन पुढील तीन वर्षासाठी नवीन जिल्हा कमिटीची निवड करून तिसऱ्यांदा कुमार मोहरमपुरी यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली व  13 सदस्यीय जिल्हा कमिटी निवडण्यात आली.

 पक्षाचे राज्य कमिटी सदस्य व लेखक कॉ.  उदय नारकर, (कोल्हापूर) हे अधिवेशनाचे उदघाटक होते तर राज्य कमिटी सदस्य व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष कॉ. किसन गुजर, (नाशिक) हे प्रमुख वक्ते होते. अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कमिटी सदस्य कॉ. शंकरराव दानव हे उपस्थित होते.

या अधिवेशनात कॉ. डी. बी. नाईक, कॉ. अनिता खुनकर व कॉ.सदाशिव आत्राम यांचे अध्यक्षीय मंडळात ह्या अधिवेशनाचे कामकाज चालविण्यात आले. 

अधिवेशनाच्या सुरुवातीला विळा हातोडा हे पक्षाचे चिन्ह असलेल्या झेंड्याला कॉ. शंकरराव दानव यांचे हस्ते फडकवून त्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी श्रद्धांजली ठराव मांडून पक्षातील, आंदोलनातील हुतात्म्यांना व कोरोनाकाळात  मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मोहरमपुरी यांनी मागील चार वर्षाच्या पक्षाचा राजकीय, संघटनात्मक व आंदोलनात्मक अहवाल उपस्थित अधिवेशनातील प्रतिनिधींसमोर मांडला. या अहवालावर 10 प्रतिनिधींनी आपले विचार मांडले व अहवालाला पाठिंबा दिला त्यानंतर अहवालाची मतदानाद्वारे पाठिंबा व मंजुरी घेण्यात आली. 

 वनाधिकार कायद्यानुसार प्रलंबित दावे मंजूर करण्यात यावे, जिल्ह्यात अनेक गावांत गोरगरीब भूमिहीन लोकांनी शासनाच्या महसूल व गायरान जमिनीवर अतिक्रमण करून जमीन वाहणाऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, खाजगी कंपन्यांकडून पीक विमा काढण्यात येतो पण त्या पीक विम्याचा लाभ मात्र कंपन्यांकडून देण्यास टाळाटाळ केल्या जाते, ह्या साठी कंपन्यांवर अंकुश लावण्यात यावे असे व अन्य महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले.

शेवटी 13 सदस्यीय जिल्हा कमिटी निवडण्यात आली. या जिल्हा कमिटीत शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, डी. बी. नाईक, अनिता खुनकर, देविदास मोहकर, चंद्रशेखर सिडाम, कवडू चांदेकर, गजानन ताकसांडे, दिलीप परचाके, सुधाकर सोनटक्के, खुशालराव सोयाम व किसनराव मोहूर्ले यांच्या समावेश आहे. या निवडलेल्या जिल्हा कमिटीमधून कॉ. कुमार मोहरमपुरी यांची तिसऱ्यांदा जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली.

या अधिवेशनाला नियमाप्रमाणे पक्ष सभासद असलेले निवडक प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नंदकिशोर बोबडे, मनोज काळे, भीमराव टेकाम, भीमराव आत्राम, शिवशंकर बांदूरकर, दीपक देशमुख, प्रवीण तोरणपवार, विजय सावरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा