Breaking
आंबेगाव : "जीव वाचवा" अभियाना अंतर्गत आदिवासी भागात विशेष कार्यक्रम


घोडेगाव : सह्याद्री स्कूलच्या दर्शन शहा या विद्यार्थ्याने सुरू केलेल्या 'जीव वाचवा' अभियाना अंतर्गत विशेष कार्यक्रम आदिवासी भागातील पिंपरी गावात पार पडला.


ह्रदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अलीकडे खूप वाढलेले आहे. हा झटका आल्यानंतर वा इतर कोणत्याही कारणाने अचानक हृदय बंद पडल्यानंतर डॉक्टरांची मदत मिळेपर्यंत विशिष्ठ प्राथमिक उपचार केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. परंतु याबद्दल लोकाना पुरेशी माहिती नसते आणि त्यामुळे रुग्णास जीव गमवावा लागतो. यासाठी सह्याद्री शाळा, यांच्या पुढाकाराने जीव वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे, या अभियाना अंतर्गत ह्रदय बंद पडले तर कसे सुरू करायचे याचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिक करून घेतले गेले.


नुकताच हा कार्यक्रम आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील पिंपरी या गावी पार पडला. "जीव वाचवा" अभियाना अंतर्गत ही कार्यशाळा अधिकाधिक गावामधून करण्याचे त्यांचे ध्येय आहे.


यावेळी एखादी व्यक्ती अचानक चक्कर येऊन पडली किंवा बेशुध्द पडली तर प्रथम त्या व्यक्तीचा श्वास चालू आहे की नाही ते पाहणे किंवा त्याच्या हाताच्या नाडीचे ठोके चालू आहे की नाही ते कसे पाहणे, याबरोबरच ते चालू नसेल तर, तातडीने त्या व्यक्तीच्या हृदयावर दोन्ही हात ठेवून पंपींग कसे करावे याचे प्रात्यक्षिक डॉ. रेश्मा शहा व दर्शन शहा यांनी करून दाखवले.


ही क्रिया 5 ते 7 मिनिटात तातडीने केल्यास, हृदयातील रक्त पुरवठा मेंदूला होतो व त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो व त्या व्यक्तीला पुढील उपचार तातडीने मिळेपर्यंत जीवदान मिळू शकते, असेही डॉ. रेश्मा शहा यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी या  वैद्यकीय अधिकारी यांचा विशेष सन्मान केला.


या कार्यक्रमाचे स्थानिक आयोजन डॉ.शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव व किसान सभा आंबेगाव तालुका समिती यांनी केले होते. या कार्यक्रमा प्रसंगी पिंपरी गावच्या सरपंच संगीता वडेकर व अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव तालुका समितीचे, सचिव अशोक पेकारी यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले. 


तर कार्यक्रमाचे नियोजन कृष्णा वडेकर, दिलीप वडेकर, तुकाराम वडेकर, वसंत वडेकर, अशोक जोशी, मच्छिंद्र वाघमारे, दिपक रड्डे यांनी केले होते. या अभियानास सह्याद्री स्कूलच्या मुख्याध्यापक पदमप्रिया शिराली व संचालक मिलिंद मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा वडेकर यांनी तर आभार तुकाराम वडेकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा