Breaking
दापोली नं.1 मराठी शाळा बालगोपालांनी गजबजली


रत्नागिरी : गेली दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे बंद असलेली दापोली शहरातील दापोली नं.1 ही मराठी शाळा आज सुरू झाली. आज जीवनशिक्षण विद्यामंदिर दापोली नं.1 येथील इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. 35 पटसंख्या असलेली दापोली नं.1 ही ऐतिहासिक मराठी शाळा शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे नियम पाळून आजपासून सुरू झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांना खूप आनंद झाला आहे. 


शहरी भागातील ही शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड वर्षानंतर प्रथमच शाळेत आलेल्या बालगोपालांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर यांनी पुष्प, चाॅकलेट, खाऊ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर  यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

श्लोक व प्रार्थना  गायनाने शाळेची सुरवात  करण्यात आली. "प्रार्थनेच्या या सुरातून" ही प्रार्थना शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ.विद्या मरूडकर यांनी आपल्या मधूर आवाजात गायली.त्यांच्यापाठोपाठ सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली. शाळेतील शिक्षिका  सौ.पिंगला रावताळे यांनी विद्यार्थ्यांना छान छान  गोष्टी सांगितल्या व पदवीधर शिक्षिका सौ.स्वाती खानविलकर  यांनी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त गाणी शिकवली. पहिल्या दिवशी वर्गशिक्षिकांनी गाणी,गोष्टी  व कृतीयुक्त खेळ यांच्या द्वारे विद्यार्थ्यांचे भरपूर  मनोरंजन केले.कोरोनाचे नियम कसे पाळावेत,याविषयीही मार्गदर्शन केले.
               
आज 1/12/2021 रोजी आमची शाळा चालू झालेली होतेय.जवळ जवळ गेली दीड पावणेदोन वर्षे कोरोना प्रादुर्भाव मुळे सर्व शाळा आणि व्यवस्थापन ठप्प झालं होतं. आणि त्यात शहरी भागातील शाळा आजपासून ख-या अर्थाने चालू होत आहेत. जसं घरात माणसे नसतील तर घराला घरपण नसतं. तसं शाळेत जर मुलं नसतील तर शाळा ही शाळा वाटत नाही.आज ख-या अर्थाने शाळा गजबजली आहे आणि मुलांशी आम्ही ऑनलाईन संपर्कात होतो.पण सतत जेवढा संपर्क आपण शाळेत मुल असताना करू शकतो तेवढा संपर्क ऑनलाईन पद्धतीने संपर्क करू शकत नाही. त्यामुळे आजपासून मुले शाळेत आलेत.आजपासून आमचा ख-या अर्थाने त्यांच्याशी अभ्यास चालू होईल,त्यांच्याशी देवाणघेवाण सुरू होईल. एवढीच प्रार्थना आहे की,आमची शाळा अशीच चालू राहू दे,अध्यापन चालू राहू दे,त्यामुळे आम्हीही आनंदी राहू आणि आमची शाळाही उत्साही आणि आनंदी राहील. अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर यांनी व्यक्त केली. 

कोवीड 19 च्या प्रादुर्भाव मुळे गेली दीड पावणेदोन वर्षापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांविना सुनंसुनं वाटत होतं. शाळेत आम्ही शिक्षक वर्ग नियमित येत होतो. परंतु शाळेत मुलं नसल्यामुळे आनंद वाटत नव्हता.आज शाळेत मुलं आलेली आहेत. आमची संपूर्ण शाळा गजबजून निघालेली आहे. खूप आनंद होत आहे. शाळेत देवीचे पूजन केले, नवीन विद्यार्थ्यांचे चाॅकलेट, खाऊ, पुष्प देऊन  स्वागत केले. त्यामुळे खूप आनंद होत आहे. मुलंही उत्साही व आनंदीत आहेत, अशी प्रतिक्रिया शाळेच्या शिक्षिका विद्या मुरूडकर यांनी व्यक्त केली.

आज मी शाळेत आलो आहे. आज मला शाळेत माझे मित्र व मॅडम भेटले आहेत. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. रोज आम्हाला मॅडम ऑनलाईन शिकवत होत्या.त्यात मजा येत नव्हती. आता शाळेत आल्यावर मॅडम शाळेत शिकवतील त्यामुळे आनंद वाटत आहे. असे मनोगत वेदांत राणे इयत्ता 7 वी विद्यार्थ्यांने व्यक्त केले. आजपासून आमची शाळा उघडली आहे. याआधी मॅडम ऑनलाईन शिकवत असल्यामुळे आनंद वाटत नव्हता.आज पहिला दिवस आहे.मॅडमने आम्हाला गोष्टी व गाणी शिकवल्या आहेत व प्रार्थना म्हणून दाखवली आहे. त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. माझे भरपूर मित्र भेटले आहेत.असा आनंद  विजय मूलूख इयत्ता 7 वी या विद्यार्थ्यांने व्यक्त केला.

शासनाच्या आदेशानुसार फक्त 3 ते 4 तास शाळा सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहार दिला जाणार नाही. कोरोनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. विद्यार्थी व पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आमची शाळा आता अशीच कायम सुरू राहावी, अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा