Breaking
आंबेगाव : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी


अखिल भारतीय किसान सभेची मागणी


आंबेगाव : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुका कृषी कार्यालय व तहसील कार्यालय यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केल्याची माहिती किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी केली आहे. तसेच हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आले आहे.

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना शेत जमिनीच्या नुकसानीकरीता मिळालेल्या अनुदान वाटपाच्या ज्या रक्कमा व जे लाभार्थी शासनाने घोषित केले आहेत. त्याविषयी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या नुकसान भरपाईची यादी सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे. या यादीवर किसान सभेसह नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत. 


किसान सभेने म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे, बांधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते असे अनेक गरजुंची नावे यादीतून वगळली आहेत. काही गावात, कृषी सहायक यांच्या मर्जीतील व त्यांचे नातलग यांना नुकसानीची रक्कम अधिक मंजूर झाल्याचे दिसून येते, तर गरजुंना मात्र तोकडी रक्कम मंजूर झाल्याचे दिसत आहे. याविषयी काही गावात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. काही वाड्या- वस्त्यांमधील एकाही शेतकऱ्यांचा या यादीत समावेश केलेला नाही (उदा. पालखेवाडी ) जे शेतकरी आज हयात नाहीत, त्यानाही नुकसानभरपाई मंजूर झालेली दिसुन येते, आदींसह तक्रारी सादर केल्या आहेत.

तर जे-जे गरजू व खरेखुरे नुकसान ग्रस्थ व्यक्ती,  या यादीतून वगळले आहे, अशा सर्व व्यक्तींना नुकसानभरपाईची रक्कम त्वरित मिळावी. लोकांच्या, या यादीविषयी जे-जे आक्षेप आहेत. ते नोंदवून घेऊन त्याची चौकशी करावी व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी. प्रचंड नुकसान होऊन ज्यांना अत्यंत तोकडी रक्कम मंजूर झाली आहे त्यांना रक्कम वाढवून मिळावी, या मागण्या किसान सभेने केल्या आहेत.


निवेदन देतेवेळी किसान सभेचे राजु घोडे, अशोक पेकार, दत्ता गिरंगे, लक्ष्मण मावळे  आदींसह उपस्थित होते.

प्रशासनाने या गंभीर मुद्यांची दखल न घेतल्यास किसान सभा व्यापक जन आंदोलन पुढील काळात उभारेल असा इशारा ही यावेळी किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा