Breaking
तामिळनाडूच्या धर्तीवर रेशनदुकानात जीवनावश्यक पुरवठा करण्याची मागणी


पिंपरी चिंचवड तामिळनाडूच्या धर्तीवर रेशनदुकानात जीवनावश्यक पुरवठा करा, अशी मागणी श्रमिक व कम्युनिस्ट कार्यकर्ते क्रांतिकुमार कडुलकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे एका ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड सह राज्यातील मोठ्या औद्योगिक शहरातील गोरगरीब रेशनकार्डधारकाना पुढील तीन महिन्यासाठी अन्नधान्य बरोबर ६ किलो साखर, ३ किलो डाळी, ६ लिटर खाद्यतेल वितरण करावे. तमिळनाडू सरकारने नुकतेच राज्यातील २५ लाख असंघटित जनतेसाठी तेल तुपासह सर्व जीवनावश्यक वस्तू देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.


मागील दोन वर्षातील महामारीमुळे तामिळनाडू, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश सरकारने आर्थिक नुकसान सहन करत असलेल्या राज्यातील जनतेच्या कुपोषण मुक्तीसाठी कल्याणकारी रेशनिंग व्यवस्था राबवली आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकार शहरे स्मार्ट करण्यासाठी प्रचंड पैसा २०१९ पासून करत आहे. सरकारने आता कल्याणकारी राज्याच्या संकल्पना राबवायला वेळ खर्च करावा.

देशी, विदेशी दारूवर टॅक्स कमी करणाऱ्या सरकारने नव्या वर्षात अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबाजवणी करण्यासाठी अंदाजपत्रकात रेशनवर सर्व जीवनावश्यक वस्तू अतिशय माफक दरात वितरीत करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.


महाराष्ट्रासारखे राज्य सकल उत्पादनात देशात आघाडीवर आहे. घरेलू कामगार, रिक्षाचालक, पथारी, पाठविक्रेते इ वर्गाचे खात्रीशीर उत्पन्न गेल्या दोन वर्षात सरासरी पाच हजार रुपये इतके घसरले असल्याचेही कडुलकर यांनी म्हटले आहे.

महागाई ४० टक्क्यांनी वाढलेली आहे. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारे सरकार आहे, त्यामुळे अन्नसुरक्षा कायद्यातील १३ वस्तूंचा पुरवठा सरकार करेल असा विश्वास व्यक्त करत कडुलकर यांनी मागण्या केल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा