Breakingशहरातील बेघर, निराधार, विमनस्क व्यक्तीची माहिती द्या - सावली निवारा केंद्राचे आवाहन


पिंपरी चिंचवड : शहरात महापालिकेने पिंपरी कॅम्पमध्ये "सावली' बेघर निवारा केंद्र  सुरु केले आहे.ऑक्टोबर २०२० पासून "रिअल लाइफ रिअल पिपल'या संस्थेतर्फे हे केंद्र चालवले जाते. मानसिक रोगी, निराधार वृद्ध, फुटपाथवर भटकणारे, सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या, शहरातील विविध भागात उघड्यावर आयुष्य जगणाऱ्या बेघरांची या निवारा केंद्रात व्यवस्था केली जाते. पिंपरी चिंचवड शहरात अशी विमनस्क, निराधार आढळल्यास सावली निवारा केंद्र, पिंपरी येथे संपर्क करावा, असे आवाहन रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेचे व्यवस्थापक गौतम थोरात यांनी केले आहे.


आतापर्यंत २५६ लोकांना या केंद्रा मार्फ़त मदत दिलेली आहे. त्यातील ३० लोकांना त्यांच्या गावाचा शोध घेउन सुखरूप पाठवणी केली आहे. समुपदेशन करून २५ लोकांना नोकऱ्या देऊन सबलीकरण केले आहे.


पिंपरी चिंचवड मनपाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत भाजी मंडई पिंपरी येथे २०२० साली सावली निवारा केंद्र सुरू केले आहे. येथे एकूण २४ खोल्या आणि १०० खाटा आहेत. निराधार व्यक्तीची माहिती आम्ही विविध स्तरावर घेत असतो, सध्या कडाक्याच्या थंडीत या लोकांना शोधून काढून देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, आमचे स्वयंसेवक त्याठिकाणी जाऊन निवारा केंद्रा मध्ये त्यांना सेवासुविधा देतील. कोणतेही कागदपत्रे नसलेल्या निराधार,हतबल लोकांना या केंद्रामार्फत आधारकार्ड, पॅन कार्ड इ महत्वाची कागदपत्रे काढून दिली जातात. असे गौतम थोरात यांनी सांगितले आहे.

रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे संचालक एम. ए. हुसेन यांनी सांगितले की, केंद्रामध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. इथे भोजन, आरोग्यसेवा इ दैनंदिन गरजेच्या सर्व सुविधा मोफत आहे. मनपाच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आणि सेवाभावी डॉक्टर, नर्सेस सर्वप्रकारच्या आरोग्य सेवा देतात.

निवारा केंद्राचे सचिन बोधनकर, अग्नेश फ्रान्सिस, मिलिंद माळी, अमोल भाट, सुनिता श्रीनाथ, लक्ष्मी वाईकर, उमा भंडारी, वंदना नायडू हे आमचे कर्मचारी निराधार लोकांचे संगोपन दैनंदिन देखभाल करतात, असे एम. ए. हुसेन यांनी सांगितले.

निवारा केंद्राचा संपर्क : ९४२२३५२६२९ / ९७६५९७८३५६ / ९५९५२९०१००

- क्रांतिकुमार कडुलकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा