Breaking

जुन्नर : पिंपळवंडीमधील पायमोडे दांपत्य राज्यस्तरीय 'आदर्श माता-पिता' पुरस्काराने सन्मानित


पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी (चाळकवाडी) येथील जगन्नाथ खंडू पायमोडे आणि अंजना जगन्नाथ पायमोडे या अल्पभूधारक शेतकरी दांपत्याचा  पुण्यातील सुसंगत फाउंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्कार प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.


पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला 

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी (चाळकवाडी) येथील जगन्नाथ व अंजना यांनी अतिशय खडतर आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. आज त्यांची दोन्ही मुले निलेश व डॉ. दिनेश हे औषधनिर्माण शास्त्रातील बहुराष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. मोठा मुलगा निलेश हे हैदराबादेतील 'साई लाईफ सायन्सेस लिमीटेड' या औषधनिर्माण शास्त्रासंबंधीत संशोधन कंपनीत शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. निलेश यांनी पुण्यातील एन. वाडीया महाविद्यालयातून सण २००८ साली रसायनशास्त्रातील पदवी संपादन केली होती.


धाकटा मुलगा डाॅ. दिनेश हे अमेरिकेतील 'मिराती थेरॅप्युटीक्स' या औषधनिर्माण शास्त्रातील संशोधन कंपनीत संशोधनाचे कार्य करत आहेत. या पुर्वी त्यांनी अमेरिकेतील 'मेडिसीन्स फाॅर ऑल' व 'ओक्लाहोमा विद्यापीठात' तीन वर्ष विवीध रोगांवरील औषधे व रासायनिक संयूगांवर संशोधन केले. अंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शास्त्रज्ञ डॉ. दिनेश यांनी कोवीड-१९ वरील परिणामकारक 'रेमडिसिव्हीर' आणि नुकतेच आपात्कालीन वापरास परवानगी मिळालेले 'मॉल्नूपिरावीर' या औषधांच्या निर्मीती प्रक्रिया विकसित केल्या आहेत. त्यांनी  सन २०१८ मधे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून रसायनशास्त्रात पि.एच. डी. संपादन केली. डॉ. दिनेश यांनी कॅंसर, एच. आय. व्ही. (एड्स), मलेरिया, काविळ सोबतच कोरोना वरील औषधांच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाचे संशोधन केले आणि त्यांचे हे संशोधन विविध अंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहे.


 केवळ इयत्ता नववी शिक्षण घेतलेले जगन्नाथ आणि इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या अंजना हे मुळचे शेतकरी कुटुंब. परंतु अवघी अर्धा एकर शेती क्षेत्र असलेल्या पायमोडे दांपत्याला जोडीला दुग्धव्यवसाय, मोलमजुरी करावी लागत असत. त्यांची मुले देखील त्यांना अशा सर्व कामांमध्ये मदत करत. अतिशय शांत, संयमी आणि सुस्वभावी अशा आपल्या मुलांना चांगल्या संस्काराचे बाळकडू त्यांच्या आईकडून त्यांना मिळाले असे जगन्नाथ सांगतात. काबाडकष्ट करून उपजीविका करत असताना मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंबाच्या सुस्वभावामुळे व प्रामाणिक आचरण यांमुळे त्यांना नातेवाईकांनी आणि शिक्षकांनी वेळोवेळी खुप मदत केली असं पायमोडे सांगतात.


या पुरस्कार प्रदान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दिपक शिकारपुर (माजी प्रांतपाल, रोटरी इंटरनॅशनल, तंत्र उद्योजक) तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत देशमुख (माजी प्रांतपाल, रोटरी इंटरनॅशनल, अंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त उद्योजक) तथा विशेष अतिथी म्हणून मारुती गलंडे (संस्थापक- सर्जाई ग्रुप, सातारा), सुसंगत फाउंडेशन चे उपाध्यक्ष धोंडीराम गडदे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील धनगर यांनी केले.  

आदर्श माता-पिता' पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पायमोडे दांपत्याने "हा पुरस्कार म्हणजे आमच्या सोबतच अशा प्रत्येक कष्टकरी माता-पित्याचा सन्मान आहे, कि जे आपल्या मुलांना पुस्तकी शिक्षणासोबतच सुसंस्कारांचे आणि नितीमत्तेचे धडे देतात व त्यांची मुले देखील त्याचे पालन करुन, आपल्या आचरणातून समाजात एक आदर्श प्रस्थापित करतात" अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.


आई- वडिलांना मिळालेला हा  पुरस्कार आमच्या जीवनातील सर्वोच्च सन्मान असल्याची भावना निलेश यांनी याप्रसंगी व्यक्त केली. "हा आमच्या जिवनातील अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होय. किंबहुना आपल्या आई वडिलांचा 'आदर्श माता-पिता' पुरस्काराने सन्मान होणे यापेक्षा वेगळं स्वर्गसुख ते काय!" असे उद्गार त्यांनी याप्रसंगी बोलताना काढले.

पायमोडे दांपत्याचा हा संघर्षमय जीवनप्रवास जवळून पाहिलेले मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध बालकवी इंजिअर शिवाजीराव चाळक  यांनी पायमोडे दांपत्याचे अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा