Breaking

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे - भाषा संवर्धन पंधरवडा चर्चासत्रातील मत


इचलकरंजी : भाषा तयार होण हे मोठे सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतर असते. मराठी भाषेबाबत हे स्थित्यंतर दोन हजार वर्षांपूर्वी झाले आहे.त्यामुळे तिची अभिजातता मोठी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आवश्यक त्या सर्व पुराव्यासह एक विस्तृत अहवाल ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके समन्वयक असलेल्या समितीने नऊ वर्षापूर्वी म्हणजे २०१३ साली सादर केला आहे.


त्यानुसार देशाची अभिजात भाषा ठरविण्याचे आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यामुळे तमिळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या भाषांप्रमाणे अभिजात दर्जा मिळाला पाहिजे असे मत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.


समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने साप्ताहिक चर्चासत्रात 'मराठी भाषा संवर्धन व अभिजात भाषा दर्जा' या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी यांनी बीजभाषण केले. तर मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन मुठाणे यांनी चर्चासत्राचा समारोप केला. या चर्चेत तुकाराम अपराध, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी यांनी या विषयाचे विविध पैलू उलगडून दाखविले.


या चर्चासत्रातून असे मत पुढे आले की, मराठीच्या बावन्न बोली भाषा आहेत. ती जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. बहात्तर देशात ती बोलली जाते. भारतातील सर्व राज्यांमध्ये मराठी भाषिक आहेत. मराठीच्या प्राचीनते विषयी विदेशी अभ्यासकांनी केलेली संशोधने अभिजाततेबाबत परिपूर्ण व स्पष्ट आहेत. 


जगातील सर्वश्रेष्ठ भाषा बनण्याची क्षमता आपल्या मराठी भाषेत आहे. त्यासाठी अभिजात भाषेच्या दर्जाची न्याय्य मागणी करत असतानाच मराठी भाषेचे सर्वांगीण दृष्ट्या संवर्धन कसे होईल, ती लोकव्यवहारात जास्तीत जास्त कशी पोहोचेल, लेखन - वाचन आणि श्रवण संस्कृती द्वारे मराठी अधिकाधिक कशी विस्तारित होईल हे पाहणे हे ही प्रत्येक मराठी माणसाचे ही कर्तव्य आहे. 


शेवटी भाषेच्या संवर्धनाची अंतिम जबाबदारी ती भाषा बोलणाऱ्या - जाणाऱ्यांना -लिहिणाऱ्या प्रत्येकाची असते. भाषा संवर्धन प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया असली पाहिजे. याची जाणीव करुन देणे व घेणे ही मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या मागील भूमिका आहे. या चर्चासत्रात शहाजी धस्ते, अशोक माने, आनंद जाधव, शकील मुल्ला यांच्यासह अन्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा