Breaking

पिंपरी चिंचवड : खोदाईमूळे सर्वत्र धूलिकण; नागरिक, व्यवसायिक त्रस्त


चिंचवडगावात नियोजनशून्य विकासकामांचा विळखा


पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या वतीने चिंचवडगावात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज, काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. मोरया गोसावी मंदिर, पडवळ आळीभाजी मंडई, तलाठी कार्यालये, तालेरा हॉस्पिटल, गॅस एजन्सी, मनपाचे झोपडपट्टी निर्मूलन कार्यालय, पीएमपीएल बस डेपो, सुपर स्पेशालिटी दवाखाने, गृहनिर्माण संस्था यामुळे या परिसरात रहदारी आणि लोकसंख्येची घनता तुलनेने जास्त आहे.


पहिल्या लॉकडाऊन पासून इथे सुरू असलेल्या विकासकामाला आमचा पाठिंबा आहे. एकाचवेळी चारी बाजूनी रस्तेविकासाची कामे सुरू केल्यामुळे रहदारी बंद झाली आहे. रस्ते सुरक्षा नियमानुसार कामे होत नाहीत. मनपाच्या स्थापत्य विभागातील सुजाण अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून निर्धारित वेळेत काँक्रिटीकरण पूर्ण केले पाहिजे. एकाचवेळी सर्व रस्ते व्यापले गेल्यामुळे व्यापारीवर्गाचे आर्थिक नुकसान होत आहे. जेष्ठ नागरिक, महिला, मुलांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे.

शिवाजी शेडगे, कामगार नेते
 माजी अध्यक्ष, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन (चिंचवडगाव)


चाफेकर चौकात उड्डाणपूल असूनही येथील वाहतूक समस्या सुटलेली नाही. चिंचवड स्टेशन ते डांगे चौक, औंध, पुणे हा मोठा जुना मुबई पुणे रस्ता येथून जातो.चिंचवड स्टेशन, आकुर्डी, दळवीनगर, वाल्हेकरवाडी, काळेवाडी, प्रेमलोक पार्क, पिंपरी, रस्टनकॉलनी ई उपनगरातून चिंचवडगावात येणाऱ्या आणि चिंचवड गावात राहणाऱ्या लोकांना गेले तीन महिने खोदाईचा त्रास होत आहे.

चाफेकर चौकासह सर्वत्र अंतर्गत भागात जेसीबी मशीन लावून सुरू केलेली खोदाई, मातीचे ढिगारे, काँक्रिटचे पेव्हिंग ब्लॉक, अवजड पाईपलाईन अर्धवट बंद केलेले रस्ते यामुळे येथील दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.


शहराची स्मार्टसिटी प्रकल्पात नोंद झाल्यावर सुरवातीच्या काळात योग्य नियोजन करायला हवे होते. सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी स्मार्ट सिटी विकास कामामध्ये ठेकेदारांची मक्तेदारी निर्माण केली आहे. प्रभागातील कामे वेगवेगळ्या एजन्सीला दिली असती तर खोळंबा झाला नसता. आता केंद्र सरकारचा निधी परत जाऊ नये म्हणून विकासकामे सुरू आहेत. नागरिक त्रस्त आहेत.

विनायक पारखीआय एस ओ लेखापरीक्षक
   चिंचवडगाव


दुचाकी आणि सायकल पण चालवता येत नाही. गॅस एजन्सीच्या गाड्यांना जायला रस्ता नाही. मनपाचा स्थापत्य विभाग, ठेकेदार, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना स्मार्ट सिटी निर्मितीचा ध्यास लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक, नागरी सुरक्षा रामभरोसे आहे. एकाच वेळी सर्व रस्ते खोदल्यामुळे सर्वत्र धुळीचे कण हवेत आणि घरामध्ये दुकानांमध्ये पसरले आहेत. विकासकामांच्या घाई मध्ये अर्थपूर्ण कामे वेगाने सुरू करण्यात आलेली आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा