Breaking
पिंपरी चिंचवड : राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू - बाबा कांबळे


पिंपरीत राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारण्यासाठी लढा उभारणार : बाबा कांबळे


कष्टकरी कामगार पंचायतीतर्फे राजमाता जिजाऊंना अभिवादन

पिंपरी चिंचवड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्मितीसाठी राजमाता जिजाऊंनी प्रेरणा दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. राजमाता जिजाऊंची प्रेरणा घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

तसेच समस्त बहुजनांची प्रेरणा असणाऱ्या जिजाऊंचा पुतळा पिंपरी चिंचवड शहरात उभारावा यासाठी लढा उभारणार असल्याचे कांबळे यांनी प्रतिपादन केले.


कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी केली. महात्मा फुले पुतळा परिसरात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

यावेळी राहुल डंबाळे, मराठा सेवा समिती अध्यक्ष सदाशिव तळेकर, कष्टकरी कामगार पंचायत कार्यध्यक्ष बळीराम काकडे, आशा कांबळे, गैरी शेलार, मधुरा डांगे, नरेश तलवार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.


बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. हे प्रश्न सोडविण्याची उदार भूमिका कोणामध्ये नाही. संघटनेच्या वतीने सातत्याने लढा देत आहोतच. या लढ्याची मूळ प्रेरणा ही राजमाता जिजाऊ पासून आम्ही घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाला आमच्या मागण्या मान्यच करायला लावू. 

तसेच पिंपरी चिंचवड शहरात राजमाता जिजाऊ यांचा कुठेही पुतळा नाही.  समस्त बहुजनांची प्रेरणा असणाऱ्या जिजाऊंचा पुतळा शहरात उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी लढा उभा करणार आहोत. तसेच महापालिका व राज्य प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा