Breaking

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून झोपडपट्टीवासियांची थट्टा : बाबा कांबळे


झोपडपट्टीतील नागरिक सुविधांअभावी हैराण ; महापालिकेची रंगरंगोटीच्या दिखाव्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील झोपडपट्टीवासिय विविध समस्यांनी हैराण झाले आहेत. झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, तुंबलेले नाले, कचरा आदी समस्या मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. त्या सोडविण्याकडे महापालिका सत्ताधारी आणि अधिकारी उदासीन दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांच्या कामाला विनाकारण परवानगी दिली जात आहे.


शहरात सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध ठिकाणी सुमारे २ कोटी रुपये खर्च करून रंगरंगोटीची कामे करण्यात येत आहेत. झोपडपट्टीच्या हजारो समस्या सोडविण्याऐवजी रंगरंगोटीवर सत्ताधारी खर्च करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. झोपडपट्टीच्या समस्या तशाच ठेऊन शहरात रंगरंगोटी करून महापालिका सत्ताधारी आणि अधिकारी झोपड्पट्टीवासियांची थट्टा करत असल्याचा आरोप, कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केला. तसेच झोपड्पट्टीवासियांच्या प्रश्नांवर महापालिकेला घेराव घालणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला. 

झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नांवर महापालिकेवर सर्वपक्षीय तिसरी आघाडीच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा

महाराष्ट्र मजूर पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब आडगळे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, भिमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे, बळीराम काकडे, सदाशिव तळेकर, अनिता सावळे, गौरी शेलार आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.  

बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, पिंपरीतील रंगरंगोटी केलेल्या टिपू सुलताननगर येथे पाहणी केली. या वेळी येथील नागरीकांनी समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. या परिसरात सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. दरवाजे निखळून पडले असल्याने महिलांची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तुंबलेले नाले काढण्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. ड्रेनेज तुंबलेले असून त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे साथीचे आजार या परिसरात वाढण्याची भीती आहे. कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. 

रंगरंगोटी केलेल्या टिपू सुलतान नगर येथील झोपडपट्टीतिल समस्यांची पाहणी करत त्या ठिकाणीचे फोटो केले प्रसारित

आरोग्य विभागाचे वाहन कचरा उचलण्यासाठी येथे येत नाही. या एका झोपडपट्टी सह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 70 पेक्षा अधिक झोपडपट्टी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही सुविधा मिळत नाही. त्यांना सुविधा मिळाव्या म्हणून, संघटनेच्या मार्फत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. घरे देऊन शहर झोपडपट्टी मुक्त करण्याची वलग्ना सत्ताधाऱ्यांनी केल्या होत्या. पाचशे स्क्वेअर फुटच्या घरात पुनर्वसन व्हावे, अशी मागणी अनेक वेळा आम्ही लावून धरली आहे. परंतु ह्या मागण्यांचा अद्याप पर्यंत सकारात्मक विचार करण्यात आला नाही. 

अशा अनेक समस्यांनी झोपडट्टीमधील नागरिक त्रस्त आहेत. त्या सोडविण्याचे तर दुरच उलट महापालिका नको त्या योजनांवर खर्च करत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका रंगरंगोटीच्या नावाखाली झोपडपट्टीमधील नागरिकांची थट्टा करत आहे. सध्या स्वच्छ भारत अभियाणांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्याचा दिखावा सुरु आहे. वरून शहर स्वच्छ दिसेल मात्र झोपड्पट्टीमधील समस्याकडे दुर्लक्ष होणार हे चित्र आहे. 


आयुक्त राजेश पाटील आणि झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त आण्णा बोदडे देखील अशी कामे मंजूर करून चुकीच्या कामांना खतपाणी घालत असल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला. झोपडपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन मुस्लिम बांधव व एससी प्रवर्गातील बांधव राहतात. त्यांच्यावर महापालिका करत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही. त्या विरोधात लवकरच महापालिकेवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.   

५ टक्के निधीचा वापरच नाही - बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकूण बजेट मध्ये ५ टक्के निधी हा एससी, प्रवर्गाच्या कल्याणासाठी वापरणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्यासाठी या निधीचा उपयोग न करता तो दुसरीकडे वळविला जात आहे. हा संबधित प्रवर्गातील नागरिकांवर अन्याय आहे. महापालिकेच्या धोरणामुळे या प्रवर्गातील नागरिकांचा विकास झाला नाही. महापालिका सत्ताधारी व अधिकाऱ्यांच्या या गैरकारभाराची तक्रार एससी, एसटी आयोगाकडे करणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा