Breaking
पिंपरी चिंचवड : विकासकामांच्या नावाखाली होणारी उधळपट्टी थांबवा - बाबा कांबळे


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी 


पिंपरी चिंचवड : विकासकामांच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होणारी उधळपट्टी थांबवा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेअंतर्गत सर्वसामान्य लोकांचे असंख्य प्रश्न रखडलेले आहेत. झोपडपट्टीतील समस्या, पाण्याचा अपुरा पुरवठा, ड्रेनेज समस्या, खड्डे, आदींसह अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर स्मारकासाठी वारंवार पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी अद्याप आर्थिक निधीची तरदूत केली नाही. 


महामाता रमाई स्मारकाची नुसतीच घोषणा करून जनतेची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात स्मारक उभारण्यात दिरंगाई होत आहे. जागा उपलब्ध असूनही त्याचे आरक्षण हटविण्यात आले नाही. त्यामुळे तो प्रश्न प्रलंबितच आहे. शहरातील गोरगरिबांच्या घरकुल योजना निधीअभावी थांबले आहे. घरकुलचे काम रखडले आहे. त्यामुळे हजारो नागरिक निवाऱ्यापासून वंचित राहिले आहेत. त्यासाठीची तरतूद होणे गरजेचे आहे. मात्र स्थायी समिती स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि ठेकेदार पोसण्याकडे अधिक लक्ष देत आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीमध्ये 309 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी दिली आहे. 


निवडणुका जवळ आल्यामुळे व कोणत्याही क्षणी त्याचा लाभ होण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधारी हे आपले ठेकेदार आणि नातेवाईक व पक्षाला मदत करणारे फायनान्सर त्यांच्यासाठी विविध विकास कामे काढत आहेत. या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. विरोधक हातावर घडी तोंडावर बोट असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्याकडून चुकीच्या कामांना विरोध होत नाही. त्यामुळे कोटयवधी रुपयांच्या विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालावा. नवीन होणाऱ्या निधीला परवानगी देऊ नये, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

- क्रांतिकुमार कडुलकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा