Breaking
छत्रपती शाहू महाराज शताब्दी गौरव समितीच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.वृषाली रणधीर तर कार्याध्यक्ष प्रा.डॉ. शरद गायकवाड


पुणे : फुले - शाहू - आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर व समविचारी संस्था, संघटना यांच्या विद्यमाने छ.राजर्षी शाहू महाराज यांचा दिनांक ६ मे २०२२ रोजी स्मृती शताब्दी दिन आहे.


महाराजांचे देशाच्या प्रती असलेले कार्य महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. महाराजांनीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ओळख सर्वप्रथम जगाला करुन दिली. महाराजांच्या कर्तृत्वानेच महाराष्ट्राची ओळख 'पुरोगामी' म्हणून प्रसिद्ध पावली, नव्हे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा शिल्पकार म्हणून छ.शाहू महाराजांकडे पाहता येते.


शंभर वर्षांपूर्वी अतिशय कर्मठ काळात सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणून ऐतिहासिक माणगाव परिषद भरवणारा राजा म्हणून जगातल्या इतिहासात शाहू महाराजांचे अलौकिकत्व आहे. त्यांचे सर्वच क्षेत्रांतील कार्य अतुलनीय आहे. अशा थोर राजाच्या स्मृती शताब्दी निमित्त छ.शाहू महाराज स्मृतिशताब्दी सामाजिक परिषद महाराष्ट्र राज्य पातळीवर घेण्याचे निश्चित झाले, असून रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी ही परिषद भोर येथे संपन्न होईल.

त्याच्या नियोजनाबाबत नुकतीच बैठक संपन्न होऊन राज्य पातळीवरील संयोजन समिती स्थापन झाली आहे ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रा.डॉ.वृषाली रणधीर (पुणे), कार्याध्यक्ष प्रा.डॉ शरद गायकवाड (कोल्हापूर), प्रा.डॉ.मेघना भोसले (पुणे), उपाध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीप पाटील, प्रा.डॉ.प्रमोद धिवार, सचिव प्रा.सुरेश खराते, खजिनदार कॉ.ज्ञानोबा घोणे,  छ.शाहू महाराज गौरव ग्रंथ निर्मिती व संपादन संपादक प्रा.डॉ.सुलभा पाटोळे, प्रकाशक सुशील म्हसदे, समन्वयक प्रा.डॉ रोहिदास जाधव यांची निवड करण्यात आली आहे.


वरील समिती राज्य पातळीवर कार्य करेल. तर स्थानिक पातळीवरील समित्या स्थापन करून पुढे कार्यरत होतील व त्या राज्य समितीला सहकार्य करतील, असे प्रा.डॉ.मेघना भोसले यांनी सांगितले.

- क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा