Breakingपुणे : मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जुन्नरमध्ये उद्या बेमुदत धरणे आंदोलन

धरणे आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदारांना देताना किसान सभेचे पदाधिकारी.

जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी जुन्नर तहसील कार्यालयासमोर १३ जानेवारी पासून जुन्नर तालुका किसान सभा बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.


तालुक्यातील मजूर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा २००५ अंतर्गत सातत्याने रोजगाराची मागणी करत आहेत. मजुरांनी अनेक वेळा तोंडी आणि लेखी स्वरुपाची मागणी केली, तसेच किसान सभेने अनेकदा निवेदने, चर्चा करुनही रोजगार मिळाला नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे किसान सभेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 


कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक मजुराला ताबडतोब काम दिले जावे, ग्रामपंचायत चावंड, निमगिरी, खैरे खटकाळे, देवळे, इंगळून, भिवाडे, जळवंडी, आंबे मधील कामाची मागणी केलेल्या मजुरांना काम न दिल्याने कायद्याने देय असलेला बेरोजगार भत्ता वाटप करावा, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये काम मागणीचे अर्ज नमुना नंबर ४ उपलब्ध करून द्यावा, विभक्त कुटुंबांचे जॉबकार्ड विभक्त करण्याची मोहीम सुरु करावी या प्रमुख मागण्यांना घेऊन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.

जर प्रशासन रोजगार देऊ शकले नाही तर मजुरांना बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. यामुळे मजुरांनी बेरोजगार भत्त्याची मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे केली. परंतु मजुरांना बेरोजगार भत्त्ताही प्रशासन अद्याप पर्यंत वाटप करू शकले नाही. यामुळे कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे तालुका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा