Breaking


पुणे : जुन्नर पर्यटन बस सेवा सुरू करावी, पर्यटन मंत्रालयाकडे मागणी


जुन्नर : पुणे दर्शन, मुंबई दर्शन आदी पर्यटन घडवून आणणाऱ्या सेवांच्या धरतीवर जुन्नर तालुक्यातही "शिवनेरी दर्शन" नावाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाबळे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. 


जुन्नर तालुक्यात शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरी, अष्टविनायकांपैकी लेण्याद्री व ओझर ही दोन मंदिरे, हडसर, चावंड, जीवधन, नारायणगड, सिंदोळा, निमगिरी आदी पर्यटकांच्या आवडीचे गडकिल्ले, आंबेहातविजचे पठार, कोकण कडा, प्राचीन कुकडेश्वर मंदिर, जागतिक वारसा लाभलेला नाणेघाट, दाऱ्याघाट, नैसर्गिक नेढं असलेला हटकेश्वर, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी व येडगाव ही पाच धरणे, मानमोडी डोंगरावरील बुध्दकालीन लेण्या, तुळजाई लेण्या व लेण्याद्री डोंगरावरील लेण्या, काळू धबधबा, आळे येथील रेड्याची समाधी, खोडद येथील जीएमआरटी, माणिकडोह येथील बिबट प्रकल्प तसेच निसर्गरम्य माळशेज घाट, हरिश्चंद्रगड आदी असंख्य पर्यटन ठिकाणे आहेत. त्यामुळे योग्य नियोजन करून बससेवा चालू केल्यास पर्यटन व्यवसाय वाढून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचे पाबळे यांनी म्हंटले आहे.


दरम्यान २०१८ साली तत्कालीन राज्यशासनाने जुन्नर तालुक्याला पर्यटनाचा विशेष दर्जा बहाल केला होता. मात्र त्याबाबतचा आराखडा किंवा निधी अद्यापही लालफितीत अडकला आहे. दोन वर्षांपूर्वी किल्ले शिवनेरी विकास निधींतर्गत २३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र त्यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त निधी रस्त्यांवरच खर्च होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

तसेच शिवसृष्टी जुन्नर येथेच व्हावी, ही शिवभक्तांची मागणी धुडकावून सदर प्रकल्प बारामती होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर येथे शिवसंस्कार श्रुष्टी होणार, अश्या घोषणा २०२० च्या डिसेंबरमध्ये करण्यात आल्या होत्या. मात्र याबाबत अद्याप काहीच हालचाल दिसत नसल्याचे शिवभक्त दिनेश परदेशी यांनी सांगितले. त्यामुळे किमान बससेवा तरी सुरू व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.


दरम्यान सध्या एसटी कामगारांचा संप सुरू आहे. मात्र शासनाने याबाबत तातडीने विचार करून आराखडा बनविला, तर येत्या पावसाळ्यापूर्वी सदर बससेवा सुरू होऊ शकते, असे मत निसर्ग अभ्यासक जितेंद्र देशमुख यांनी व्यक्त आहे. 

पावसाळ्यात परिसरातील विविध धबधब्यांना लाखो पर्यटक भेट देत असतात. तसेच सदर बस ही शिवनेरी किंवा शिवशाही असावी, ती जुन्नर बस स्थानकातुन सुटून सायंकाळी नारायणगाव येथे जावी, विविध पर्यटन स्थळांसाठी वेगवेगळी पॅकेज उपलब्ध करून द्यावीत, त्याबाबत ऑनलाईन बुकिंग सेवा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्या पर्यटन मंत्रालयाकडे करण्यात आल्या आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा