Breaking
पुणे : जुन्नर पंचायत समितीच्या भिंती लागल्या बोलू

सावित्रीबाई फुले विद्यालय, ओतूरचे कलाशिक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी रेखाटलेले भिंती चित्र

जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुका पंचायत समिती कार्यालय व परिसरातील भिंती आकर्षक भित्तीचित्रे व घोषवाक्यांनी बोलू लागल्या आहेत. गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तालुक्यातील ३५ कलाशिक्षकांनी एकत्र येत आपले कलाकौशल्य पणाला लावत पंचायत समिती कार्यालय व परिसरातील भिंती ४० भित्तिचित्रे व घोषवाक्यांनी बोलक्या करीत अभियानाचा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम या निमित्ताने केले आहे. 


हेही वाचा ! जुन्नर : आर्यबाग परिवारातर्फे स्व. शेवंताबाई विठ्ठल खोकले वाचनालयास पुस्तके भेट


यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या अनेक जनसामान्यांचे लक्ष वेधण्याचे काम या भिंती करीत आहे. तर अनेकांनी या कामाचे व कलाशिक्षकांचे कौतुक केले आहे.  
कलाशिक्षिका दिपीका रोकडे व ज्योती दांगट यांनी रेखाटलेले भिंती चित्र

विद्या विकास मंदीर, राजूरी येथे कलाशिक्षिका दिपीका रोकडे म्हणाल्या, "गटविकास अधिकाऱ्यांनी कलाशिक्षकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करू दिले, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आम्हाला छान वाटतं की वेगळं काहीतरी करायला मिळतंय. वेगळा अनुभव आला आणि उत्साह पण वाढण्यास मदत झाली. फक्त आमची हीच अपेक्षा आहे की आम्ही इतक्या मेहनतीने हे भिंती चित्र रेखाटले आहे. त्यावर कोणी थुंकू नये."


ज्योती दांगट म्हणाल्या, "आम्हाला भिंती चित्र रेखाटल्याची एक संधी निर्माण झाली आणि आमचा आत्मविश्वास वाढला. ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रशासनाचे आम्ही आभार व्यक्त करतो."
कलाशिक्षक आर. एस. केदार व सुरेश कदम यांनी रेखाटलेले भिंती चित्र 

यात सहभागी झालेले कलाशिक्षक एस.एम. सगर, पी.व्ही. मिरगे, महेंद्र तोडकर, आर. व्ही. जाधव, एस. जी. सोनवणे, एस.व्ही. खंडाळे, एस. आर. रोकडे, डी. एस. पाटील, व्ही.एस. कोतवाल, सौ. जे.जे. दांगट, सौ. एस.पी. आहेर, सौ. डी.ए. रोकडे, सौ. टि.एस. टकले, सौ. आर. एस. घाटकर, पी. आर. सुर्यवंशी, एम.एम. थोरात, एस.व्ही. गटकळ, बी.बी. सदामते, आर. एस. केदार, आर.एस. मधे, एस. एस. वाडकर, बी. एन. साबळे, सुरेश कदम, पी. एन. चिंतामणी, ए.बी. शिंदे, एन.के. आनंदराव, एस.एन. कठाळे, अतुल भगत, गोरक्ष शिंदे, डी. फटांगरे, विनय रावळ, या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले आहे.


या सर्वांना सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी किसन खोडदे, समन्वयक यश मस्करे यांचे विशेष सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा