Breaking

श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त व पुजा-यांचे ऐकून पदाचा गैरवापर करणाऱ्या भा.प्र.से. पुजार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी


२५ जानेवारीपासून माहूर तहसिलसमोर आमरण


नांदेड : मागील पंधरा दिवसापासून सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचा सत्याग्रह श्री रेणुका देवी संस्थानच्या पायथ्याशी अखंड सुरू आहे.कडाक्याच्या थंडीत व मागे झालेल्या अवखाळी पावसातही सर्व कर्मचारी माता रेणुकेच्या पायथ्याशीच होते.

चार वर्षापासून सीटू चे युनिट तेथे कार्यरत आहे.अनेक वेळा संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व स्थानिक समितीच्या पदाधिका-या बरोबर तत्कालीन मुख्य न्यायाधीश व सचिव तसेच इतर पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या सकारात्मक बैठका झाल्या आहेत.


संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांना पूर्व लक्षी प्रभावाने कायम स्वरूपी नियुक्ती आदेश देण्यात येतील व किमान वेतनाची पूर्तता करण्यात येईल असे लेखी पत्र संस्थानचे तत्कालीन सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सीटू मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व स्थानिक समितीचे अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव यांना दिलेले आहे.तसेच दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजी अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आहे.

स्थानिक समितीच्या  पदाधिका-यांनी अनेक वेळा संस्थानच्या सर्व पदसिद्ध महोदयांना लेखी आश्वासना प्रमाणे कारवाई करावी म्हणून विनंती केली आहे. तसेच सिटू संघटनेच्या वतीने झालेल्या अनेक मोर्चे आंदोलनात श्री रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांना कायम आदेश व किमान वेतन देण्यात यावे ही मागणी करण्यात आली आहे.


परंतु दोन वर्षे संपून गेले तरी कारवाई होत नसल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक निर्णय घेऊन गडावरील सर्व कार्य व्यवस्थित व्हावे याचे नियोजन करून दि.१० जानेवारी पासून महाआरती करून पहिल्या पायरी जवळ सत्याग्रह सुरू केला आहे. विशेष म्हणजे गडावर अष्टगंध लावून अर्धवेळ काम करणारे काही लोक दररोज पाचशे ते सहासे रुपये कमवितात म्हणजे दरमहा किमान पंधरा हजार रूपये त्यांना मिळतात परंतु संस्थानामध्ये मागील दहा ते पंधरा वर्षापासून आदेश प्राप्त केलेल्या व अखंड सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ आठ हाजार ते जास्तीतजास्त तेरा हजार रुपये दरमहा पगार आहे. म्हणजेच या महागाईच्या काळामध्ये मुलांचे शिक्षण,कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य व उदरनिर्वाह ह्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नाहीत अशी परिस्थिती आहे.

पंधरा दिवसापासून अगदी शांततेत चालणाऱ्या सत्याग्रहाची अद्याप दखल घेण्यात येत नसल्यामुळे सर्वसामान्यातून संताप व्यक्त होत आहे.दि.२१ जानेवारी रोजी माहूर टी पॉईंट येथे अ.भा.किसान सभा व स्टुडंट फेडरेशन आॕफ इंडिया या संघटनांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे खरा,परंतु संस्थानचे सचिव काही वादग्रस्त विश्वस्तांचे ऐकून कायदेशीर कारवाई करण्यात रस दाखवित नाहीत हे शंका येण्या सारखेच आहे. सन १९९१ च्या दशकातील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी असलेले विश्वस्त सर्व वरिष्ठांची दिशाभूल करून कर्मचाऱ्यांना व भावीकांना वेठीस धरीत आहेत.


आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट श्री किर्तीकिरण पुजार हे आपल्या पदाचा गैरवापर करून राज्य घटनेचे उल्लंघन करीत आहेत. डॉ.बाबासाहेबांनी लिहलेल्या राज्य घटनेची पायमल्ली करून पदाचा गैरवापर करणाऱ्या सचिवांच्या विरोधात तसेच त्यांच्यावर योग्य कारवाई करावी म्हणून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गंभीर तक्रार किसान सभा, सीटू व एसएफआय या राष्ट्रीय संघटनांनी केली आहे. उपरोक्त तिन्हीही संघटनेचे शकडो कार्यकर्ते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी दि.२५ जानेवारी सकाळी ११.०० वाजता माहूर तहसिल समोर आमरण उपोषणास बसणार आहेत. 

दि.२५ जानेवारी रोजी उपोषणार्थींच्या नावाची यादी तहसिलदार माहूर व पोलीस निरीक्षक माहूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयास पाठविण्यात येणार आहे. निवेदक व उपोषणार्थींच्या जिवीतास काही धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संस्थानचे सचिव,विश्वस्त व जिल्हा प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद आहे.


निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री,राज्याचे पोलीस महासंचालक, धर्मदाय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, तहसिलदार माहूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे माहूर यांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती सीटूचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा