Breaking


जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य युवक युवतींना मिळाले पाहिजे - अ‍ॅड.मनीषा महाजन


पिंपरी चिंचवड : आधुनिक शिक्षणाने विचार करण्याची प्रेरणा मिळाली. देशातील लोकसंख्येमध्ये युवाशक्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी मोठया प्रमाणात बालविवाह पाळण्यात लावले जायचे.आता बालविवाहाला कायद्याने बंदी असली तरी असे विवाह होत आहेत. पत्रिका, जात, हुंडा असे विविध गोष्टी पाहून लग्न ठरवले जाते. मुलाचे मुलीचे शिक्षण आणि त्यांच्या मनातील अपेक्षांचा विचार न करता पालक त्यांच्या आर्थिक - सामाजिक परिस्थितीला शोभेल असे वधू किंवा वर, त्यांच्या  स्वंतत्र विचाराचा विचार न करता ठरवतात. 


शिकलेल्या लग्नाळू युवक युवतींना मनासारखा जोडीदार आजही निवडण्याचे स्वातंत्र्य  नाही. ओळखीची आवडलेली मुलगी किंवा मुलगा  जोडीदार म्हणून हवा/हवी असे पालकांना मुले सांगू शकत नाहीत. जात, धर्म, समाज याच्या भीती पोटी  बोहल्यावर उभे राहावे लागते. आजच्या समाजात एकमेकांच्या विचारातून मन जुळलेल्या तरुणाईने आंतरजातीय, आंतर धर्मीय विवाह केले आणि ते यशस्वी झालेले आहेत. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य तरुणाईला मिळाले तर कुटुंब व्यवस्थेत खुलेपणा येईल. असे विवेचन अ‍ॅड.मनीषा महाजन, राज्य कायदा व्यवस्थापन विभाग, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी बहुजन संघटकच्या "जोडीदार निवडताना" या विषयावरील प्रबोधन ऑनलाइन व्याख्यानात केले आहे.


हेही वाचा ! पुरोगामी चळवळीवर शोककळा ! ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी .पाटील यांचे निधन


देखणा मुलगा, सुंदर मुलगी इतरांचे काय?

लग्नासाठी देखणा मुलगा आणि सुंदर मुलगीच असली पाहिजे, मग इतर मुलामुलींनी काय करायचे, शेकडो पत्रिका पाहून मुलींना नाकारण्याचे प्रमाण जास्त आहे. वयात आल्यावर लग्नाचे विचार केले जातात, एकदाचे उरकून टाकू, दोनाचे चार करू या जुनाट संकल्पनामुळे लग्न लादली जातात. नोकरदार मुलगा,जमीन जुमला असलेला पाहिजे अशा अपेक्षा असतात. मग भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुलांनी काय करायचे. शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत.अशी आजची परिस्थिती आहे. 


एकमेकांवर प्रेम आहे, एकमेकांना समजून घेऊन, विवेकी विचार करून जात पात न मानता, लग्नातील अनावश्यक रूढी परंपरांना फाटा देऊन, हुंड्या सारख्या कुप्रथेला नाकारून, कन्यादानासारखे चुकीचे कर्मकांड नाकारून साधे, सोपे, कमी खर्चात विवाह रजिस्टर पद्धतीने किंवा सत्यशोधक पद्धतीने विवाह करून स्वतःच्या कर्तृत्वाने  जीवन जगणे ही महत्त्वाची बाब आहे. असे स्वतंत्र विचार करून विवाह झाले तर एक चांगले कुटुंब निर्माण होऊन चांगली समाज व्यवस्था निर्माण होईल, असेही महाजन म्हणाल्या. 

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा