Breaking

जुन्नर : रोजगार मिळाला आता बेरोजगार भत्त्यासाठी लढा देणार, निमगिरीतील महिलांचा मजूरांचा निर्धार !


जुन्नर : ग्रामपंचायत निमगिरी येथील रानचरी येथे रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निमगिरीच्या सहकार्याने आणि किसान सभेच्या प्रयत्नातून पानंद रस्त्याला सुरुवात झाल्याने महिला मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 


गावामध्ये रोजगार मिळू शकतो यावर या गावातील मजुरांचा विश्वास नव्हता. किसान सभेने वेळोवेळी जागृती करून येथील मजुरांना मागणी अर्ज भरण्याची विनंती केलेली होती. सप्टेंबर २०२१ मध्ये ६२ मजुरांनी ग्रामपंचायतमध्ये काम मिळावे म्हणून अर्ज केलेला होता. परंतु प्रशासन काम देण्यास टाळाटाळ करत होते. दोन वेळा निदर्शन आणि मोर्चे करूनही प्रशासनाने फक्त आश्वासने दिलेली होती. यामुळे आपल्याला काम मिळूच शकत नाही आणि आता परगावी काम करण्यासाठी जाण्याची तयारी मजुरांनी केलेली होती. 


यामुळे २ मार्च २०२२ पासून किसान सभा जोपर्यंत मजुरांना काम मिळत नाही आणि त्यांच्या हक्काचा बेरोजगार भत्ता मिळत नाही तोपर्यंत अमरण उपोषण करणार असल्याचे पत्र दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने सूत्रे हलविण्यास सुरुवात केली आणि ताबडतोब निमगिरी येथील मजुरांना काम मिळाले. आणि आता रोजगारासाठी गाव सोडावे लागणार नाही याचा तात्पुरता का होईना दिलासा मजुरांना मिळाला. 

मजुरांना प्रशासनाने उशिरा का होईना काम दिल्याने किसान सभेने प्रशासनाचे आभार मानले आहेत. परंतु याच वेळी मजुरांना मागील पाच महिने काम न दिल्याने या पाच महिन्याचा बेरोजगार भत्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अमरण उपोषण मागे घेणार नाहीत असे संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी सांगितले. 


यानिमित्ताने ग्रामसेवक दिघे, किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, ग्रामपंचायत सदस्य संजय साबळे, पेसा मोबिलायझर अनुसया लांडे, रोजगार सेवक रामदास रढे, देवराम अवसले उपस्थित होते. 

तसेच रंजना साबळे, पराबाई साबळे, संगिता साबळे, विमल साबळे, काळाबाई  साबळे, भामाबाई साबळे, कांताबाई साबळे, उषा साबळे, अलका साबळे, विमल भवारी, सुनिता साबळे, वनिता भवारी, निबांबाई आसवले, ललिता आसवले, बबन साबळे, पमाबाई साबळे, विमल साबळे आदींसह २२ मजूर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा